नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षभरात १ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे, ज्यामुळे ते जगातील आघाडीच्या दहा श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले असले तरी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ते कायम आहेत. या उलट गौतम अदानी यांच्या संपत्तीत १ लाख कोटी रुपयांची भर पडली, असे ‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५’ने गुरुवारी स्पष्ट केले.

रिलायन्स समूहातील काही कंपन्यांवरील वाढता कर्जाचा भार, रिलायन्सच्या ऊर्जा आणि किरकोळ विक्री क्षेत्रातील मंदावलेली वाढ आणि कंपन्यांच्या समभागांचे घसरलेल्या किमती यामुळे ही त्यांच्या वैयक्तिक संपत्तीत घसरण झाली आहे. गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये १३ टक्क्यांची वाढ होऊन ती ८.४ लाख कोटी रुपये झाली आहे. दरम्यान, टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहेत, त्यांची एकूण संपत्ती ८२ टक्क्यांनी वाढून ४२० अब्ज डॉलर म्हणजेच ३४.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

आशियातील अब्जाधीशांची राजधानी म्हणून शांघायने मुंबईला मागे टाकले असले तरी, ९० नावांसह मुंबई भारतातील अब्जाधीशांचे केंद्र राहिले आहे. शांघायमध्ये आता ९२ अब्जाधीश आहेत, तर बीजिंगमध्ये ९१ अब्जाधीश आहेत. मुंबईत ११ नवीन अब्जाधीशांची भर पडली, जे लंडन (७) आणि बीजिंग (८) पेक्षा जास्त आहेत.

भारत तिसऱ्या क्रमांकावर

जागतिक श्रीमंतांमध्ये भारतातील २८४ अतिश्रीमंताचा समावेश असून, अब्जाधीशांच्या संख्येबाबतीत तो जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात १३ अब्जाधीशांची नव्याने भर पडली आहे, ज्यामुळे त्यांची एकूण संख्या २८४ झाली. भारतीय अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती ९८ लाख कोटी रुपये आहे. जी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) सुमारे एक तृतीयांश आणि सौदी अरेबियाच्या संपूर्ण जीडीपीपेक्षा अधिक आहे. या २८४ व्यक्तींपैकी १७५ जणांची संपत्ती वाढली, तर १०९ जणांची संपत्ती घसरली किंवा स्थिर राहिली.

रोशनी नाडर जगातील पाचव्या श्रीमंत महिला

रोशनी नाडर आणि त्यांच्या कुटुंबाने ३.५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह, जगातील पाचव्या सर्वात श्रीमंत महिला बनण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. एचसीएल टेकच्या वारसदार म्हणून त्यांच्या वडिलांकडून ४७ टक्के हिस्सा हस्तांतरणानंतर जगातील आघाडीच्या १० महिला अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत.

कोणाची किती संपत्ती?

मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीज – ८.६ लाख कोटी रुपये

गौतम अदानी, अदानी समूह – ८.४ लाख कोटी रुपये

रोशनी नाडर, एचसीएल टेक – ३.५ लाख कोटी रुपये

दिलीप संघवी, सन फार्मा – २.५ लाख कोटी रुपये

अझीम प्रेमजी, विप्रो – २.२ लाख कोटी रुपये

कुमार मंगलम बिर्ला, आदित्य बिर्ला समूह – २ लाख कोटी रुपये

सायरस पूनावाला, सीरम इन्स्टिट्यूट – २ लाख कोटी रुपये

नीरज बजाज, बजाज ऑटो – १.६ लाख कोटी रुपये

रवी जयपुरिया, आरजे कॉर्प – १.४ लाख कोटी रुपये

राधाकिशन दमानी, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स – १.४ लाख कोटी रुपये

कोणत्या देशात किती अब्जाधीश?

अमेरिका: ८७० अब्जाधीश

चीन: ८२३ अब्जाधीश

भारत: २८४ अब्जाधीश –