मुंबई : आघाडीची प्रवासी वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या (एचएमआयएल) समभागांचा शुक्रवारी निफ्टी नेक्स्ट ५०, निफ्टी १००, निफ्टी ५०० आणि इतर प्रमुख भांडवली बाजार निर्देशांकांमध्ये समावेशाची घोषणा करण्यात आली.
गेल्या वर्षी २२ ऑक्टोबर २०२४ रोजी ह्युंदाई मोटर इंडियाचे समभाग आयपीओपश्चात मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध झाले. आता कंपनीच्या समभागाने निफ्टी नेक्स्ट ५० आणि बीएसई ५०० सारख्या प्रतिष्ठित निर्देशांकांचा भाग बनून, भारतीय भांडवली बाजारातील स्थान मजबूत केले आहे. यामुळे बाजारपेठेतील उपस्थिती आणि विश्वासार्हता अधिक मजबूत होईल, असे एचएमआयएलचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम म्हणाले.
राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडला त्यांच्या निफ्टी नेक्स्ट ५० निर्देशांक, ब्रॉड मार्केट निर्देशांक आणि थीमॅटिक निर्देशांकांमध्ये समाविष्ट केले आहे. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या मॉर्गन स्टॅन्ले कॅपिटल इंटरनॅशनलच्या अलिकडेच झालेल्या पुनर्रचनेमध्ये, ‘एमएससीआय ग्लोबल स्टँडर्ड’ निर्देशांकात सामील होणारी ह्युंदाई मोटर इंडिया ही भारतातील एकमेव लार्ज कॅप होती.
ह्युंदाई मोटर इंडियाच्या समभागाला यापूर्वी मुंबई शेअर बाजाराच्या, बीएसई ५००, बीएसई ऑल कॅप, बीएसई लार्ज कॅप आणि बीएसई लार्ज मिडकॅप आणि इतर निर्देशांकात २४ मार्चपासून समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी हा समभाग ३.१८ टक्क्यांनी म्हणजेच ५६ रुपयांनी घसरून १,७०६.८५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या त्याच्या बाजार भावानुसार कंपनीचे १,३८,६८८ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.