वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ह्युंदाई मोटर इंडियाची बहुप्रतिक्षित प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवड्यात खुली होईल. यासाठी प्रति समभाग किंमतपट्टा १,८५६ ते १,९६० रुपये राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दक्षिण कोरियातील मोटार निर्मिती कंपनी ह्युंदाईची उपकंपनी असलेली ह्युंदाई मोटार इंडिया या आयपीओच्या माध्यमातून २५ हजार कोटी रुपये उभारणार आहे. भांडवली बाजारात कंपनी सूचिबद्ध झाल्यानंतर तिचे बाजारमूल्य १९ अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. यामुळे हा देशातील आजवरची सर्वांत मोठी निधी उभारणी ठरणार आहे. हा आयपीओ संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १४ ऑक्टोबरला खुला होईल. त्यानंतर किरकोळ व इतर गुंतवणूकदारांसाठी ते १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान खुला असेल. कंपनीचे समभाग २२ ऑक्टोबरला मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : ‘एनएसडीएल’मधील हिस्सेदारीची एनएसई, एचडीएफसी बँक, स्टेट बँकेकडून विक्री; प्रस्तावित ‘आयपीओ’ला सेबीकडून हिरवा कंदील

ह्युंदाई मोटर इंडियाच्या आयपीओमध्ये कंपनी नव्याने समभागांची विक्री करणार नाही. दक्षिण आफ्रिकेतील पालक कंपनीकडून ह्युंदाई मोटर इंडियातील १७.५ टक्के हिश्शाची विक्री केली जाईल. या ‘ऑफर फॉर सेल’च्या माध्यमातून ही विक्री होणार आहे. देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील देखील हा जवळपास दोन दशकानंतर आलेला सर्वांत मोठा आयपीओ असेल. याआधी २००३ मध्ये मारूती सुझुकीचा आयपीओ सर्वांत मोठा ठरला होता.