नवी दिल्ली : प्रवासी वाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ह्युंदाईने नवीन वर्षात म्हणजेच १ जानेवारीपासून वाहनांच्या किमती २५,००० रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन उत्पादक कंपन्यांवर मागील काही काळापासून सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतीचा दबाव आहे. वाहननिर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने वाहनांच्या किमती वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. यामुळे जानेवारी २०२५ पासून विविध श्रेणींमधील वाहनांच्या किमती वाढणार आहेत. वाहननिर्मितीसाठी येणाऱ्या खर्चात वाढ होण्याबरोबरच प्रतिकूल विनिमय दर आणि वाहतूक (लॉजिस्टिक) खर्चात झालेली वाढदेखील किंमत वाढीस कारणीभूत ठरली आहे. ह्युंदाईपाठोपाठ आता इतर वाहन उत्पादक कंपन्यांकडूनदेखील नवीन वर्षात वाहनांच्या किमतीत वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> रिझर्व्ह बँकेकडून ऑक्टोबरमध्ये २७ टन सोने खरेदी
सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतीमुळे, आता या वाढीव खर्चाचा काही भाग किरकोळ किंमत समायोजनाद्वारे ग्राहकांवर टाकणे अनिवार्य होते, असे ह्युंदाई इंडियाचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण गर्ग यांनी सांगितले. वाढत्या खर्चाचा अधिक भार कंपनीने सोसला असून ग्राहकांवर कमीत कमी किंमत भार टाकला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. देशात ह्युंदाईची वाहने ५.९२ लाख रुपयांपासून ४६.०५ लाख रुपये किमतीच्या श्रेणीत आहे.
अलीकडेच ह्युंदाई मोटर इंडियाचे समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध झाले आहेत. गुरुवारच्या सत्रात समभाग ३.८० रुपयांनी वधारून १,८७६ रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, तिचे १,५२,४३२ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.