पीटीआय, नवी दिल्ली
देशातील सनदी लेखापालांची सर्वोच्च संस्था ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)’ने, कथित २,१०० कोटी रुपयांच्या हिशेबी तफावतींचा स्वतःहून उलगडा करणाऱ्या इंडसइंड बँकेच्या आर्थिक विवरणपत्रांची छाननी करणारा आढावा तिच्याकडून घेतला जाऊ शकतो, असे स्पष्ट संकेत गुरुवार दिले.
खासगी क्षेत्रातील या बँकेने त्यांच्या डेरिव्हेटिव्ह्ज सौद्यांमधील नुकसान कमी लेखणाऱ्या काही विसंगती त्यांच्या लेख्यांमध्ये आढळल्याचे १० मार्च रोजी उघड केले आहे. ज्यातून डिसेंबर २०२४ पर्यंतच्या बँकेच्या निव्वळ मालमत्तेच्या सुमारे २.३५ टक्के म्हणजेच जवळपास २,१०० कोटी रुपये इतका फटका बसू शकतो, असे अंतर्गत पुनरावलोकन केले असता म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, ‘आयसीएआय’च्या वित्तीय अहवाल परीनिरीक्षण मंडळाकडून (एफआरआरबी) इंडसइंड बँकेच्या आर्थिक विवरणपत्रांचा आढावा घेतला जाऊ शकतो, असे या शिखर संस्थेचे अध्यक्ष चरणज्योत सिंग नंदा यांनी गुरुवारी वृत्तसंस्थेला सांगितले. सक्रियपणे कृतीचे पाऊल म्हणून अशा शक्यतेचे त्यांनी संकेत दिले. अर्थात बँकेनेही या कथित लेखा अनियमिततांची त्रयस्थ लेखा परीक्षण संस्थेकडून छाननी करून नुकसानीचे नेमके प्रमाण ठरविले जाईल, असे १० मार्चलाच स्पष्ट केले आहे. एप्रिलच्या सुरुवातीला या संस्थेकडून अहवाल येणे अपेक्षित आहे.
कंपन्यांकडून लेखाविषयक मानके, लेखापरीक्षण मानके, कंपनी कायदा २०१३ च्या दुसऱ्या व तिसऱ्या अनुसूचीचे पालन केले जात आहे का याचे मूल्यांकन करण्यासाठी ‘आयसीएआय’चे वित्तीय अहवाल परीनिरीक्षण मंडळ (एफआरआरबी) हे कंपन्यांच्या वित्तीय विवरणांचा आढावा घेत असते. शिवाय लेखा आणि लेखापरीक्षणांवरील विविध मार्गदर्शक सूचना आणि रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सर्वसमावेशक परिपत्रक/निर्देशांचे पालन केले जात आहे का याचे देखील मंडळ मूल्यांकन करते.