पीटीआय, नवी दिल्ली
खासगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने बचत ठेवींवरील व्याजदरात ०.२५ टक्क्याची कपात केली आहे. विद्यमान कॅलेंडर वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपोदरात सलग दुसऱ्यांदा कपात केल्यानंतर बँकांनी कर्जदर आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात सुरू केली आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ५० लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यातील रकमेवर २.७५ टक्के दराने व्याज मिळेल. तसेच ५० लाख रुपयांपेक्षा अधिक ठेवींसाठी, व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी करून ३.२५ टक्के करण्यात आला आहे.
आयसीआयसीआय बँकेचे हे सुधारित दर बुधवारपासून लागू करण्यात आले आहेत. प्रतिस्पर्धी एचडीएफसी बँकेनेही ठेवींवरील व्याजदरात कपातीची नुकतीच घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेकडून बचत खात्यांवर २.७० टक्के दराने व्याज दिले जाते. गेल्या काही दिवसांत इतर बँकांकडूनही मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे.
रेपोदर कपातीस वाव
देशांतर्गत आघाडीवर महागाई रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेनुरूप कमी झाली आहे. परिणामी, आगामी काळात रिझर्व्ह बँकेकडून आणखी रेपोदर कपात शक्य आहे. मध्यवर्ती बँकेने आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीचे संकेत दिले आहे. गेल्या काही तिमाहींमध्ये बँकांपुढे वाढत्या ठेवींचे आव्हान निर्माण झाले आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्थेतील तरलताही कमी झाली आहे.