मुंबईः आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने महिलांसाठी विकसित केलेली ‘आयसीआयसीआय प्रू विश’ ही नवीन योजना सोमवारी दाखल केली. जीवन विमा उद्योगातील अशा प्रकारची ही पहिलीच योजना असून, जी योजनेत संरक्षण दिल्या गेलेल्या गंभीर आजारांचे निदान झाल्यावर एकरकमी संपूर्ण भरपाईचे लाभ प्रदान करते.
‘आयसीआयसीआय प्रु विश’ योजनेतून महिलांना स्तन, ग्रीवा, गर्भाशय कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांच्या निदानासाठी आरोग्य विमा कवच रकमेच्या १०० टक्क्यांपर्यंत त्वरित लाभ दिला जाईल. महत्त्वाचे म्हणजे, विमा हप्त्यांची रक्कम ३० वर्षांच्या कालावधीसाठी स्थिर राहणार आहे. ज्यामुळे विमाधारकाला त्यांच्या निधीचे अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करता येईल. प्रीमियम हॉलिडे हे या योजनेचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. यातून विमाधारकाला हप्ते भरण्याच्या मुदतीत कधीही १२ महिन्यांच्या कालावधीसाठी हप्ता न भरण्याचा पर्याय खुला राहिल. विशेष म्हणजे, विमाधारक महिलेला मातृत्वाशी संबंधित गुंतागुंत आणि नवजात बाळाच्या जन्मजात आजारांशी संबंधित विमा संरक्षण घेण्याचा पर्याय देखील मिळेल.
हेही वाचा : तुमचा आरोग्य विम्याचा दावा मंजूर झाला? गेल्या वर्षभरात तब्बल १५ हजार कोटींचे दावे नामंजूर
महिलांच्या आरोग्यविषयक गरजा ध्यानात घेऊन ‘रिइन्शुरन्स ग्रुप ऑफ अमेरिका (आरजीए)’ यांच्या सहकार्याने विकसित केलेली ही देशातील अद्वितीय योजना असल्याचे आयसीआयसीआय प्रु. लाइफ इन्शुरन्सचे मुख्य उत्पादन व वितरण अधिकारी अमित पल्टा म्हणाले. योजनेची रचना अशा पद्धतीने केली आहे, ज्यामुळे विमाधारक महिलेला विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींसाठी अनेकदा दावे करता येतात. विमाधारकाला मिळालेले अतिरिक्त पे-आउट लाभ त्यांना आजारातून बरे होत असताना पुनर्वसन खर्च उचलण्यास देखील मदतकारक ठरू शकते.