मुंबईः आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने ग्रामीण विकास आणि संबंधित संकल्पनेवर बेतलेली समभागसंलग्न (इक्विटी) योजना, रूरल अपॉर्च्युनिटीज फंडाची घोषणा केली आहे. प्रामुख्याने ग्रामीण भारताच्या विकास आणि प्रगतीत योगदान देणाऱ्या आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये गुंतलेल्या कंपन्यांच्या समभाग व समभागसंलग्न साधनांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. योजनेचा प्रारंभिक गुंतवणूक प्रस्ताव (एनएफओ) ९ जानेवारीला खुला होईल आणि २५ जानेवारीला बंद होईल.
ग्रामीण भारत पुढील दशकभरात परिवर्तनात्मक प्रभाव पडू शकतो. कदाचित देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावणारा हा प्रमुख विभाग असेल, असे आयसीआयसीआय प्रुडेंशियल एएमसीचे कार्यकारी संचालक व मुख्य गुंतवणूक अधिकारी तसेच योजनेचे निधी व्यवस्थापक शंकरन नरेन यांनी नमूद केले. नवीन योजनेचे उद्दिष्ट या घडामोडींचा लाभ घेणे, गुंतवणूकदारांना भारताच्या ग्रामीण विकासगाथेत सहभागी होण्याची संधी देणे असल्याचे ते म्हणासे.
हेही वाचा : वर्षारंभ धडाक्यात… ‘सेन्सेक्स’ची तीन शतकी सलामी
भारताच्या जीडीपीचा महत्त्वपूर्ण भाग ग्रामीण भागातून येतो आणि म्हणूनच ग्रामीण पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्था सुधारण्यावर सरकारचे लक्ष असून, केंद्र व राज्यांच्या अनेक कल्याणकारी योजना या विभागावर केंद्रित आहेत. हेच घटक या योजनेत वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता दर्शविणाऱ्या आहेत. ‘निफ्टी रूरल इंडेक्स टीआरआय’ हा योजनेचा मानदंड निर्देशांक आहे, जो निफ्टी ५०० निर्देशांकातील समभागांच्या कामगिरीचा मागोवा घेत असतो. प्रियंका खंडेलवाल योजनेच्या सह-निधी व्यवस्थापक आहेत.