नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावण्याची चिन्हे आहेत. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनातील घट आणि रबी हंगामातील कमी पेरणी यामुळे विकास दर ६ टक्क्यांच्या खाली नोंदविला जाईल, असा अंदाज ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने गुरुवारी वर्तविला. ‘इक्रा बिझनेस ॲक्टिव्हिटी मॉनिटर’मध्ये सलग दुसऱ्या महिन्यात डिसेंबरमध्ये घट नोंदविण्यात आली असून, तो ८.१ टक्के नोंदविण्यात आला. ही निर्देशांकाची सहा महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात तो ९.६ टक्के, तर डिसेंबर २०२२ मध्ये ७.९ टक्के होता. सणासुदीचा कालावधी संपल्यामुळे व्यवसायांमधील वृद्धी कमी झाली. याचबरोबर वीज आणि पेट्रोलच्या मागणीतही घट झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> तुमचा आवडता हल्दीराम ब्रँड आता नवीन कंपनी खरेदी करण्याची तयारीत

कृषी क्षेत्रात शून्यवत वाढ

देशाचा विकास दर सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ७.६ टक्के नोंदविण्यात आला होता. इक्रा पतमानांकन संस्थेने म्हटले आहे की, ऑक्टोबर ते नोव्हेंबर कालावधीत सरकारकडून भांडवली खर्चात कपात करण्यात आली. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनातील मोठी घसरण आणि रबी हंगामातील पिकांच्या पेरणीत झालेली घट यामुळे कृषी क्षेत्राच्या सकल मूल्यवर्धनात (जीव्हीए) किचिंत अथवा काहीच वाढ दिसून न येण्याचा अंदाज आहे. या सर्व कारणांमुळे तिसऱ्या तिमाहीत विकास दर ६ टक्क्यांच्या खाली नोंदला जाईल. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत तो ७.६ टक्के होता. विजेची मागणी यंदा १ ते १५ जानेवारी या कालावधीत मागील वर्षातील जानेवारीच्या तुलनेत किरकोळ ३.४ टक्क्यांनी वाढली. डिसेंबरच्या तुलनेत ही मागणी १.६ टक्क्याने अधिक आहे. यंदा १ ते १७ जानेवारी या कालावधीत नवीन वाहनांची दैनंदिन सरासरी नोंदणी मागील वर्षातील जानेवारीपेक्षा ३९.२ टक्के अधिक आहे. मात्र, सरलेल्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीतील दैनंदिन वाहन नोंदणी १.८ टक्क्याने कमी आहे. याला पितृ पक्ष कारणीभूत ठरला आहे. हिंदू परंपरेप्रमाणे कोणत्याही नवीन कार्य आणि खरेदीसाठी हा अशुभ काळ मानला जातो, त्यामुळे वाहनासह इतर गोष्टींची या काळात खरेदी परंपरेने कमी असते, असे इक्राने नमूद केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icra big prediction about india s gdp growth of 3rd quarter of current year print eco news zws
Show comments