मुंबई : पूर्वाश्रमीच्या डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवा आणि धीरज वाधवा या बंधूंना सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने ‘सराईत कर्जबुडवे’ (विल्फुल डिफॉल्टर) बुधवारी जाहीर केले. या दोघांवर बँकेचे ७५८ कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा ठपका आहे.
वाधवा बंधूंचा बँक गैरव्यवहार मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात उघड झाला होता. देशाच्या बँकिंग क्षेत्रातील हा आतापर्यंतच्या मोठ्या गैरव्यवहारांपैकी एक मानला जातो. सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली कर्जदात्या बँकांच्या गटाने डीएचएफएल, वाधवा बंधू आणि इतरांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांनी गुन्हेगारी कट आखून बँकांची ४३ हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
या तक्रारीच्या आधारे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वाधवा बंधू, डीएचएफएल आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने म्हटले होते की, वाधवा बंधू आणि इतर आरोपींनी बँकांकडून ४२ हजार ८७१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले. या बँका प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील आहेत. डीएचएफएलच्या ताळेबंदामध्ये फेरफार करून कर्जाच्या पैशाचा गैरवापर करण्यात आला. आरोपींनी कर्ज बुडवल्यामुळे बँकांना मोठा फटका बसला. आयडीबीआय बँकेचे डीएचएफएलचे बुडीत कर्ज जुलै २०२० मध्ये ‘फसवणूक’ (फ्रॉड) म्हणून गृहीत धरण्यात आले. त्या वेळी बँकेच्या या बुडीत कर्जाचा आकडा ९६१.५८ कोटी रुपये होता. बँकेकडून वाधवा बंधू आणि डीएचएफएलला कर्जबुडवे जाहीर करण्याची प्रक्रिया ऑक्टोबर २०२० मध्ये सुरू करण्यात आली. परंतु, वाधवा बंधू आणि इतर आरोपी कारागृहात असल्याने ही प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाला.