आज म्हणजेच ३० सप्टेंबर ही २ हजार रुपयांची नोट बँकेत जमा करण्याची किंवा इतर नोटांसोबत बदलण्याची शेवटची संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने शुक्रवारी स्पष्ट केले की, १ ऑक्टोबरपासून २००० रुपयांच्या नोटेचे मूल्य शून्य होणार आहे. म्हणजे ते कागदाच्या तुकड्यापेक्षा अधिक काही राहणार नाही, अशी वृत्तसंस्था एएनआयने माहिती दिली आहे.
आरबीआयने या वर्षी १९ मे रोजी एक परिपत्रक जारी करून ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यास किंवा बदलण्यास सांगितले होते. यानंतरही २००० रुपयांची नोट कायदेशीर राहतील, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.
हेही वाचाः मारुती सुझुकीला जीएसटी प्राधिकरणाकडून १३९.३ कोटी रुपयांची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
नोटा बदलण्याची अंतिम तारीख वाढवण्यासाठी शनिवारी संध्याकाळपर्यंत एक परिपत्रक जारी केले जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, असंही आरबीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे.
हेही वाचाः कच्च्या तेलावर विंडफॉल कर वाढला, एटीएफ आणि डिझेलवरील निर्यात शुल्क केले कमी
२००० ची नोट २०१६ मध्ये आली होती
२००० रुपयांची नोट नोव्हेंबर २०१६ मध्ये बाजारात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या जागी नव्या पॅटर्नमध्ये ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या. मात्र, २०१८-१९ पासून RBI ने २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली आहे. तर २०२१-२२ मध्ये ३८ कोटी २००० रुपयांच्या नोटा नष्ट झाल्या.