कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्के करून कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचा संताप पाहून घाबरलेल्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धाव घेऊन नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार असल्याचे सांगत आहेत. नाफेडमार्फत कांदा खरेदी ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. केंद्र सरकारने वाढवलेले ४० टक्के निर्यात शुल्क कमी का करत नाहीत? याचे उत्तर जनतेला द्या, अशी विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

कांद्याच्या प्रश्नावर भाजपा सरकारवर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मागील वेळीही कांद्याचे दर पडल्यानंतर नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते पण प्रत्यक्षात नाफेडने कांदा खरेदी केला नाही तसेच तूर, चणा व कापूसही नाफेडने खरेदी केला नाही. कांदा नाशवंत आहे, तो खराब झाला तर त्याची भरपाई सरकार देणार आहे का? शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कमजोर करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलेले आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः कांद्याच्या निर्यातशुल्कात वाढ करून ते ४०% करण्याचा मोदी सरकारचा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा:- नाना पटोले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी, आंदोलजीवी, खलिस्तानी म्हणून त्यांचा अपमान केला हे शेतकरी विसरलेले नाहीत. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या भाजपा व नरेंद्र मोदींकडून शेतकऱ्यांना काहीही अपेक्षा नाहीत. शेतकरी पेटून उठला तर भाजपाचा सत्तेचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणालेत.

हेही वाचाः LIC ने Jio Financial Services मधील ६.६६ टक्के हिस्सा घेतला विकत; गुंतवणूकदारांना किती फायदा?

कांद्याचा दरावरून राज्यभर तीव्र संताप व्यक्त केला जात असताना राज्यातील मंत्री मात्र लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. कांदा परवडत नसेल तर महिना-दोन महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडतं? असा उद्धट सवाल शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी केला आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांना ना शेतकऱ्यांची चिंता आहे ना जनतेची, हे सत्तेच्या मस्तीत आहेत पण जनता त्यांना योग्य वेळी धडा शिकवेल असेही नाना पटोले म्हणाले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If onion purchase is going to be nullified the farmers are misled why is the export duty not cancelled the question of various factions says nana patole vrd