नवी दिल्ली: कर्जबाजारी झालेल्या आयएल अँड एफएस समूहाने सरलेल्या मार्चअखेरीस ४५ हजार २८१ कोटी रुपयांची कर्जफेड केली आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणासमोर सादर केलेल्या अहवालातून ही माहिती सोमवारी पुढे आली.

आयएल अँड एफएसने सादर केलेल्या अहवालानुसार, समूहाने २१ मार्च २०२५ पर्यंत ४५ हजार २८१ कोटी रुपयांचे कर्जफेड केली आहे. कंपनी आणखी ६१ हजार कोटी रुपयांची कर्जफेड करणार आहे. समूहातील ३०२ कंपन्यापैकी १९७ कंपन्यांची कर्जप्रकरणे निकाली काढली गेली आहेत. आता केवळ १०५ कंपन्यांची कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. याआधी सहा महिन्यांपूर्वी समूहाने ३८ हजार ८२ कोटी रुपयांची कर्ज प्रकरणे निकाली काढली होती.

समूहाच्या नवीन संचालक मंडळाच्या अंदाजानुसार एकूण ६१ हजार कोटी रुपयांची वसुली होईल. समूहावर ऑक्टोबर २०१८ रोजी असलेल्या एकूण कर्जापैकी ही ६१ टक्के वसुली पूर्ण झालेली असेल. कर्जवसुली प्रक्रियेचा भाग म्हणून समूहातील कंपन्यांची बँक हमी आणि लेटर ऑफ क्रेडिट व्यवहार रद्द करण्यात येत आहेत. समूहातील कंपन्यांना तात्पुरत्या स्वरूपात रोख रक्कम वितरित केली जात आहे, असेही समूहाने अहवालात म्हटले आहे.