वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर २०२४-२५ या आर्थिक वर्षात ७ टक्के राहील, असा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मंगळवारी वर्तविला. याआधी वर्तविलेल्या ६.८ टक्के विकास दराच्या अंदाजात २० आधारबिंदूंची वाढ तिने केली आहे. खासकरून ग्रामीण भागात सुधारत असलेल्या मागणीचे परिणाम बघता हा सुधारित अंदाज आला आहे.
आयएमएफने पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच २०२५-२६ मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर (जीडीपी) ६.५ टक्क्यांपर्यंत खालावेल, असे अंदाजले आहे. मात्र देशातील वाढती उपभोग पातळी बघता विद्यमान वर्षात तो ७ टक्के राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, सरलेल्या आथिर्क वर्षात जीडीपी ८.२ टक्क्यांनी विस्तारला, तो २०२२-२३ मध्ये नोंदवलेल्या ७ टक्क्यांपेक्षा जास्त आणि चौथ्या तिमाहीतील ७.८ टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे.
हेही वाचा >>>Gold-Silver Price: सोन्याचे दर बदलले, जाणून घ्या मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमचा दर
रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये अर्थव्यवस्था ७.२ टक्के दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्या महिन्यात सांगितले की, भारत सध्या मोठ्या संरचनात्मक बदलाच्या उंबरठ्यावर आहे. जिथे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल वार्षिक ८ टक्के विकासदराकडे सुरू असून, हा दर सातत्यपूर्ण आणि दीर्घ काळ टिकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
पहिल्या तिमाहीतील देशांतर्गत आघाडीवर वस्तूंची आणि सेवांची वाढती मागणी यासह मजबूत निर्यातीमुळे आयएमएफने कॅलेंडर वर्ष २०२४ साठी चीनच्या वाढीचा अंदाज ४० आधारबिदूंनी वाढवून ५ टक्के केला आहे. तर कॅलेंडर-वर्ष २०२४ मध्ये भारताचा विकास दर ७.३ टक्के आणि २०२५ मध्ये ६.५ टक्के राहील असा तिचा अंदाज आहे.
हेही वाचा >>>Anant Ambani Wedding Cost : अनंत अंबानीच्या शाही लग्नात ५००० कोटींचा खर्च, मुकेश अंबानींची संपत्तीवर किती फरक पडणार?
जागतिक अर्थगती मात्र धिमी
कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था आधी अंदाजलेल्या ३.२ टक्के दराने मार्गक्रमण करेल. तर पुढील वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये तिचा दर किंचित वधारून ३.३ टक्के राहण्याची शक्यता आहे. शिवाय २०२४ मध्ये जागतिक चलनवाढीचा दर गेल्या वर्षीच्या ६.७ टक्क्यांवरून ५.९ टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा सकारात्मक अंदाज आयएमएफने वर्तवला आहे. ऊर्जा आणि अन्नधान्याची चलनवाढ आता जगातील बहुतांश देशांमध्ये करोनापूर्व पातळीवर परतली आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ज्ञ पिएरे-ऑलिव्हर गुरिंचास यांनी व्यक्त केले.
जागतिक विकास दरात निम्मे योगदान राखणाऱ्या भारत आणि चीनबाबत वाढसूचक सुधारित अंदाज जरी सकारात्मक असला, तरीही एकंदर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी पुढील पाच वर्षांची शक्यता ही मुख्यत्वे उदयोन्मुख आशियाई अर्थव्यवस्थांची गती मंदावल्यामुळे कमकुवतच आहे.– पिएरे-ऑलिव्हर गुरिंचास, मुख्य अर्थतज्ज्ञ, आयएमएफ