पीटीआय, नवी दिल्ली
समभागांच्या किमतीत हेराफेरी आणि लेखाविषयक फसवणुकीच्या आरोपांनी अदानी समूहाला हादरवून सोडणाऱ्या अमेरिकी गुंतवणूकदार संस्था ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने मंगळवारी भारतीय भांडवली बाजार नियामक ‘सेबी’कडून मिळालेल्या कारणे दाखवा नोटिशीचा ‘मूर्खपणा’ म्हणून उल्लेख करत, ‘पूर्वनिश्चित उद्देशानुरूप अदानींना छुपी मदत करण्यासाठी घडून आलेला हा बनाव’ असल्याचे म्हटले.
‘सेबी’ने हिंडेनबर्गला २७ जूनला ४६ पानी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘अदानींच्या समभागांवर सट्टा लावताना झालेल्या कथित नियम उल्लंघना’साठी बाजार नियामकांकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे. तथापि हा प्रकार म्हणजे भारतातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीने केलेल्या भ्रष्टाचार आणि फसवणुकीचा पर्दाफाश करणाऱ्यांना गप्प करण्याचा आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न आहे, असे हिंडेनबर्गने प्रत्युत्तरादाखल म्हटले आहे. न्यूयॉर्कस्थित या संस्थेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात, अदानी समूह स्वत:च त्यांच्या समभागांत दशकांहून अधिक काळ हेराफेरी करत आला आहे. याव्यतिरिक्त त्यांच्या लेखाविषयक फसवणुकीच्या योजनाही राजरोस सुरू होत्या. असे आरोप करणारा अहवाल सादर केल्यानंतर, अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांच्या मूल्यात घट होण्याची अपेक्षा होती आणि त्यामुळे साहजिकच त्यात आनुषंगिक व्यवहार केला गेला, असा खुलासाही हिंडेनबर्गने केला आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्ग रिसर्चने केलेले सर्व आरोप वारंवार फेटाळले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने या संबंधाने सेबीच्या तपासाचा हवाला देत अदानींना पुढे कोणतीही चौकशीस होणार नाही, असा निर्वाळा दिला आहे.
हेही वाचा >>>Gold-Silver Price: सकाळ होताच सोन्याच्या दरात बदल, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत किती?
ताज्या नोटिशीवर हिंडेनबर्गने म्हटले आहे की, ‘दीड वर्षाच्या तपासानंतर, आमच्या अदानीसंबंधाने संशोधन अहवालात तथ्यात्मक चुका शून्य असल्याचे ‘सेबी’नेही सांगितले. तरी नियामकांनी अदानी प्रवर्तकांवर अनेक पूर्वीच्या घटनांचे वर्णन करताना ‘अपहार’ (स्कँडल) या शब्दाचा वापर करण्यासारख्या गोष्टींवर आक्षेप घेतला. भारतीय नियामकांकडून अनेकवार दगलबाजीचे आरोप झालेले असताना हे असे केले गेले. हिंडेनबर्गने केलेल्या खुलाशात असाही आरोप केला आहे की, सेबीची अदानींशी गुप्त सामंजस्य आणि छुपी मदत जानेवारी २०२३ मध्ये तिने प्रकाशित केलेल्या अहवालानंतर लगेचच सुरू झाली, जी आजतागायत कायम आहे.
हेराफेरी करणाऱ्यांचा माग घेण्याऐवजी अशा बेकायदेशीर प्रथांचा पर्दाफाश करणाऱ्यांच्या पाठलागात सेबीला अधिक रस दिसतो. ही भूमिका भारत सरकारच्या कृतीशीही सुसंगत आहे, ज्यांनी अदानींबद्दल टीकात्मक लेख लिहिल्याबद्दल चार पत्रकारांना अटक करण्याचा प्रयत्न केला आणि अदानींवर टीका करणाऱ्या संसद सदस्यांची हकालपट्टी केली. – हिंडेनबर्ग रिसर्च
(‘सेबी’च्या ४६ पानांच्या नोटिशीच्या उत्तरादाखल)