पीटीआय, नवी दिल्ली
सोन्याच्या भावातील वाढ शुक्रवारी सलग आठव्या दिवशी कायम राहिली. दिल्लीतील सराफा बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला २०० रुपयांनी वधारून ८३ हजार रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.
ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या महितीनुसार, दिल्लीत सोन्याचा भाव आज प्रति १० ग्रॅमला २०० रुपयांनी वाढून ८३ हजार १०० रुपयांवर पोहोचला. बाजार बंद होताना हा भाव ८२ हजार ९०० रुपयांवर स्थिरावला. याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलोला ५०० रुपयांनी वधारून ९४ हजार रुपयांवर पोहोचला. बाजार बंद होताना हा भाव ९३ हजार ५०० रुपयांवर स्थिरावला.
वस्तू वायदे बाजार मंच एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ३३४ रुपयांनी वाढून ७९ हजार ९६० रुपयांवर पोहोचला. याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलोला ८३५ रुपयांनी वाढून ९१ हजार ९८४ रुपयांवर गेला. जागतिक धातू वायदे मंच कॉमेक्सवर सोन्याचा भाव प्रतिऔंस १५.५० डॉलरने वाढून २ हजार ७८० डॉलरवर पोहोचला आणि चांदीचा भाव प्रतिऔंस ३१.३२ डॉलरवर गेला.
याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले की, देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक देशांवर अतिरिक्त व्यापार कर लादले जाण्याची शक्यता पाहता, जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वारे निर्माण झाले आहे. या अनिश्चितेत गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे गुंतवणूकदार वळत आहेत.
आगामी केंद्रीय अर्थसंकल्प आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांबाबत घेतला जाणारा निर्णय या दोन्ही गोष्टींकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. भविष्यात या दोन्ही गोष्टींवर सोन्याचे भाव अवलंबून असतील. – जतीन त्रिवेदी, विश्लेषक, एलकेपी सिक्युरिटीज