देशाची राजधानी दिल्लीत राहणाऱ्या लोकांचं टोमॅटोनं पुन्हा एकदा टेन्शन वाढवलं आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीत टोमॅटोचे भाव आणखी भडकणार आहेत. याचे कारण हिमाचलमधून टोमॅटोचा पुरवठा कमी होणार असून, टोमॅटोचे दर राजधानीत तीनशे रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. खरं तर बाजारातील व्यापाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच ग्राहक व्यवहार मंत्रालयाशी संबंधित विभागाच्या वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, २ ऑगस्ट रोजी दिल्लीत टोमॅटोची सरासरी किरकोळ किंमत २०३ रुपये आहे, पण गेल्या काही दिवसांत त्याची किंमत २५० रुपये प्रति किलोपेक्षा जास्त झाली आहे. दुसरीकडे अधिकृत वेबसाइटनुसार, देशातील सर्वात महाग टोमॅटो पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये २६३ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टोमॅटोचा भाव ३०० रुपये किलो होण्याची शक्यता

महिनाभरापासून टोमॅटोच्या दरात वाढ होत असताना येत्या काही दिवसांत तो ३०० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कमी पुरवठा झाल्याने टोमॅटोचे घाऊक भाव वाढणार असल्याचे घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम किरकोळ किमतीत वाढ झाल्यामुळे दिसून येतोय, असे त्यांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या आझादपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न विपणन समिती अर्थात एपीएमसीचे सदस्य अशोक कौशिक यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे टोमॅटोचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने गेल्या तीन दिवसांत टोमॅटोची आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटोचा भाव १६० रुपये किलोवरून २२० रुपये किलो झाला आहे, त्यामुळे किरकोळ बाजारातही भाव वाढू शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे. टोमॅटो, शिमला मिरची आणि इतर हंगामी भाज्यांच्या विक्रीत मोठी घट झाल्याने भाज्यांच्या घाऊक विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागत असल्याचे ते म्हणाले. प्रमुख उत्पादक प्रदेशात अतिवृष्टीमुळे पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे टोमॅटोचे भाव एक महिन्याहून अधिक काळ वाढत आहेत.

हेही वाचाः अदाणींनी दुसरी कंपनी घेतली विकत, ५००० कोटींमध्ये केली खरेदी

काय अडचण आहे?

माहिती देताना आझादपूर भाजी मंडईचे घाऊक व्यापारी संजय भगत म्हणाले की, हिमाचल प्रदेशात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याची वाहतूक करताना अनेक अडचणी येत आहेत. उत्पादकांकडून भाजीपाला आणण्यासाठी नेहमीपेक्षा सहा ते आठ तास जास्त लागत आहेत. अशा स्थितीत टोमॅटोचा भाव किलोमागे ३०० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. ते म्हणाले की, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या टोमॅटो आणि इतर भाज्यांचा दर्जा घसरला आहे. हिमाचल प्रदेशात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचाः विश्लेषण : ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर जीएसटी परिषदेत पुन्हा चर्चा होण्याची शक्यता

मागणी आणि पुरवठा दोन्ही कमी

दरम्यान केंद्र सरकार १४ जुलैपासून अनुदानित दराने टोमॅटोची विक्री करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजधानीत किरकोळ किमती नरमल्यात, मात्र पुरवठ्यात कमतरता असल्याने किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. आझादपूर एपीएमसी सदस्य अनिल मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, बाजारात टोमॅटोचा पुरवठा आणि मागणी दोन्ही कमी असल्याने विक्रेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विक्रेत्यांना भाजीपाला येण्यास उशीर होत असून, त्याचा दर्जा ढासळणे अशा अडचणी येत आहेत. याशिवाय टोमॅटो, शिमला मिरची, फ्लॉवर, कोबी या भाज्या घेण्यास ग्राहक नाखूश आहेत.

सरकारी टोमॅटोचा भाव काय आहे?

ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, बुधवारी टोमॅटोची किरकोळ किंमत २०३ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून खराब हवामानामुळे टोमॅटोच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या दोन दिवसांत आझादपूर मंडईतही आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. कमी पुरवठ्यामुळे घाऊक बाजारात दरात मोठी वाढ झाली असून, त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही झाला आहे. आझादपूर मंडई, आशियातील सर्वात मोठी घाऊक फळे आणि भाजीपाला बाजारात टोमॅटोचे घाऊक दर बुधवारी गुणवत्तेनुसार १७०-२२० रुपये प्रति किलोदरम्यान होते.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In delhi state of the country tomato are directly rs 300 per kg but what is the reason vrd
Show comments