मुंबई: भारतीय बँकांच्या कर्ज वितरणातील वाढ सरलेल्या सप्टेंबरमध्ये वर्षापूर्वीच्या याच महिन्याच्या तुलनेत १४.४ टक्क्यांवर सीमित राहिल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या वर्षी याच महिन्यांत बँकांची कर्जवाढ १५.३ टक्के होती. ऑगस्टमध्येही बँकांची कर्जवाढ मंदावली होती.
देशाच्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेची कर्जवाढ, एचडीएफसी लिमिटेडच्या विलीनीकरणाच्या परिणामासह सरलेल्या महिन्यात १३ टक्के असे एकंदर सरासरीपेक्षा कमी राहिली. वर्षापूर्वी या बँकेबाबत हेच प्रमाण दमदार २० टक्के होते. बुडित कर्जाच्या विशेषत: क्रेडिट कार्डावरील उसनवारी थकत चालल्याच्या जोखमीमुळे चिंतित असलेल्या रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षीच्या अखेरीस बँकांवर वाढीव भांडवलाची आवश्यकतेची अट लादल्याने कर्ज वितरणात त्यांनी आखडता हात घेतल्याचे दिसून येते.
हेही वाचा : Diwali Gold Silver Price : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
विशेषतः व्यक्तिगत कर्जे आणि क्रेडिट कार्डांवरील उसनवारी यासारख्या कर्ज विभागांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ पाहता, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी कर्जवाढीच्या उत्साहाला आवर घालण्याचा बँकांना इशारा दिला. या कर्ज विभागांतून थकीत कर्जाचे वाढत्या प्रमाणांसह, बँकांची या प्रकारच्या कर्जातील वाढ लक्षणीय मंदावली आहे. व्यक्तिगत कर्जांमधील वाढ यंदाच्या सप्टेंबरमध्ये वार्षिक तुलनेत निम्म्याने घटून १२.१ टक्क्यांवर ओसरली आहे. त्याच वेळी बँकांची क्रेडिट कार्ड थकबाकीतील वाढ वर्षापूर्वीच्या ३१.४ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत घसरल्याचे रिझर्व्ह बँकेची ताजी आकडेवारी दर्शविते.
हेही वाचा : ‘एनएसई’कडून २० कोटी ग्राहक संख्येचा टप्पा
सेवा क्षेत्राला बँकांच्या पतपुरवठ्यातील वाढ वर्षापूर्वीच्या २१.६ टक्क्यांवरून यंदाच्या सप्टेंबरमध्ये १५.२ टक्क्यांपर्यंत घसरली. या घसरणीत मुख्य वाटा बँकेतर वित्तीय कंपन्यांच्या घटलेल्या कर्जांचा आहे. त्या उलट, सप्टेंबरमध्ये उद्योगांना दिलेली कर्जे वार्षिक आधारावर ९.१ टक्क्यांनी वाढली आहेत, गेल्या वर्षीच्या ६ टक्क्यांच्या तुलनेत जलद वाढ या कर्ज प्रकाराने अनुभवली आहे.