पुणे : देशातील सात महानगरांत परवडणाऱ्या घरांचा मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत विक्री न झालेल्या परवडणाऱ्या घरांच्या साठ्यात १९ टक्के घट झाली आहे. याचवेळी विक्री न झालेल्या आलिशान घरांचा साठा तब्बल २४ टक्क्यांनी वाढला आहे.

अनारॉक ग्रुपने देशातील सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकता यांचा समावेश आहे. या अहवालानुसार, कोविड संकटानंतर परवडणाऱ्या घरांना मागणी कमी झाली. या घरांची विक्री कमी झाल्याने त्यांचा पुरवठाही कमी झाला. यंदा पहिल्या तिमाहीत परवडणाऱ्या घरांचा (किंमत ४० लाख रुपयांपेक्षा कमी) साठा १ लाख १३ हजारांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १ लाख ४० हजार होता. यंदा त्यात १९ टक्क्यांची घट झाली आहे. यंदा पहिल्या तिमाहीत विक्री न झालेल्या आलिशान घरांचा (किंमत १.५ कोटी रुपयांपेक्षा कमी) साठा १ लाख १३ हजार आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ९१ हजार १२५ होता. त्यात यंदा २४ टक्के वाढ नोंदविण्यात आली.

बंगळुरूमध्ये परवडणाऱ्या घरांच्या साठ्यात सर्वाधिक ५१ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. त्याखालोखाल चेन्नई ४१ टक्के घट झाली आहे. हैदराबादमध्ये मात्र परवडणाऱ्या घरांच्या साठ्यात ९ टक्के वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकता, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये आलिशान घरांच्या साठ्यात वाढ झाली आहे. याचवेळी चेन्नई आणि पुण्यात आलिशान घरांच्या साठ्यात अनुक्रमे ४ व ११ टक्के घट झालेली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

यंदा पहिल्या तिमाहीत मध्यम गटातील घरांचा (किंमत ४० ते ८० लाख रुपये) साठा १ लाख ५८ हजारांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १ लाख ७५ हजार होता. त्यात यंदा १० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. सर्वच प्रकारच्या घरांचा साठा यंदा पहिल्या तिमाहीत ५ लाख ६० हजार आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ५ लाख ८१ हजार होता. त्यात यंदा ४ टक्के घसरण झाली आहे, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोविड संकटानंतर परवडणाऱ्या घरांच्या मागणीत मोठी घट झाली होती. यामुळे अशा घरांचा पुरवठा कमी झाला होता. या घरांच्या साठ्यात आता मोठी घट झाली असल्याने या घरांना मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.

अनुज पुरी, अध्यक्ष, अनारॉक ग्रुप

परवडणारी घरे (किंमत ४० लाखांपेक्षा कमी)

महानगर – पहिली तिमाही २०२५ – पहिली तिमाही २०२४ – बदल (टक्क्यांमध्ये)

मुंबई : ५३,९४२ : ६०,७८३ : – ११

पुणे : १४,६८६ : २०,५२२ : – २८

दिल्ली : २५,१०५ : ३२,१८९ : – २२

बंगळुरू : ३,३२३ : ६,७३६ : – ५१

हैदराबाद : १,८१५ : १,६६० : ९

चेन्नई : १,०९० : १,९४६ : – ४४

कोलकता : १२,७८३ : १६,०६९ : – २०

एकूण : १,१२,७४४ : १,३९,९०५ : – १९