पीटीआय, नवी दिल्ली
अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या आठ पायाभूत क्षेत्रांची वाढ ऑगस्टमधील १.६ टक्क्यांच्या तुलनेत सरलेल्या सप्टेंबरमध्ये २ टक्क्यांवर पोहोचली असली तरी गेल्या वर्षी याच महिन्यांतील ९.५ टक्क्यांच्या तुलनेत ती कमालीची खुंटली आहे, अशी माहिती बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीवरून समोर आली.

वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आठ प्रमुख क्षेत्रांपैकी खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि वीजनिर्मिती क्षेत्राने सुमार कामगिरी करत सप्टेंबरमध्ये नकारात्मक वाढ नोंदवली. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या प्रमुख क्षेत्रांची वाढ एप्रिल ते सप्टेंबर या आर्थिक वर्षाच्या सहा महिन्यांत ४.२ टक्के नोंदवली गेली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ती ८.२ टक्के नोंदवली गेली होती.

हेही वाचा : सोन्याची मागणी सप्टेंबर तिमाहीत १८ टक्क्यांनी वाढून २४८ टनांवर

‘आयआयपी’त घसरणीचीच शक्यता

औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) मध्ये आठ प्रमुख क्षेत्रांचे ४०.२७ टक्के योगदान आहे. हे पाहता या निर्देशांकांच्या काही दिवसांनी जाहीर होणाऱ्या आकड्यांतही मोठी घसरण संभवते. ऑगस्ट २०२४ मध्ये आयआयपी वाढीचा दर २२ महिन्यांत प्रथमच नकारात्मक बनला होता आणि तो उणे (-)०.१ टक्के नोंदवला गेला. आधीच्या जुलै २०२४ मध्ये हा दर ४.८ टक्के पातळीवर होता.