पीटीआय, नवी दिल्ली
सरलेल्या जानेवारीमध्ये वितरकांकडून वाहन निर्मात्या कंपन्यांकडे प्रवासी वाहनांच्या मागणीत १.६ टक्क्यांची वाढ झाली असून, ३.९९ लाख वाहनांची मागणी नोंदवली गेली आहे, असे ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)’ संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले. ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने वाहन विक्रीत झालेली मोठी वाढ, एकूण वाहन विक्रीत वाढीस कारणीभूत ठरली.
जानेवारी महिन्यातील ही आतापर्यंतची वाहन निर्मात्या कंपन्यांकडून वितरकांकडे पाठवली जाणारी मोठी प्रवासी वाहनांची खेप ठरली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एकूण प्रवासी वाहनांची घाऊक विक्री ३.९३ लाख होती. कंपन्यांकडून त्यांच्या संबंधित वितरकांना युटिलिटी वाहनांची पाठवणी गेल्या महिन्यात ६ टक्क्यांनी वाढून २.१२ लाख वाहनांवर पोहोचली आहे, जी गतवर्षी म्हणजे जानेवारी २०२४ मध्ये २ लाख होती.
प्रवासी वाहनांची विक्री गेल्या महिन्यात १.२७ लाख अशी स्थिर राहिली, जी मागील वर्षी याच कालावधीत १.२६ लाख होती. व्हॅनची विक्री जानेवारी २०२४ मधील १२,०१९ हजारांवरून ६.४ टक्क्यांनी घसरून ११,२५० व्हॅनवर मर्यादित राहिली. दीर्घकालीन आर्थिक वाढ, वैयक्तिक प्राप्तिकरातील ताजे बदल आणि रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात या गोष्टी ग्राहकांचा विश्वास, पर्यायाने वाहनांची मागणी वाढविण्यास मदतकारक ठरेल, असा विश्वास ‘सियाम’चे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले.
कंपन्यांची वाहन विक्री किती?
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाने गेल्या महिन्यात १.७३ लाख वाहनांची रवानगी केली, जी गेल्या वर्षी जानेवारीमधील १.६६ लाखाच्या तुलनेत यंदा ४ टक्क्यांनी वाढली आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने वितरकांना ५४,००३ वाहने पाठवली, ज्याचे प्रमाण गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ५७,११५ वाहने असे होते, जे यंदा ५ टक्क्यांनी घटले आहे. महिंद्र अँड महिंद्रची घाऊक विक्री जानेवारीमध्ये ५०,६५९ वाहनांवर पोहोचली, जी गतवर्षीच्या याच कालावधीत ४३,०६८ वाहने होती. गेल्या महिन्यात एकूण दुचाकी वाहनांची विक्री वार्षिक आधारावर २.१ टक्क्यांनी वाढून १५.२६ लाखांवर पोहोचली, जी जानेवारी २०२४ मध्ये १४.९५ लाख होती.