मुंबई : भारतीय वित्ततंत्र कंपन्यांनी (फिनटेक) वित्तीय सेवा-सुविधेचे सार्वत्रिकीकरण करून, त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांचा वेग, विस्तार, वैविध्य अतुलनीय असून ‘फिनटेक’ कंपन्यांनी जगाला मोहात पाडले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, मुंबईत ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’च्या समारोपाच्या दिवसांतील विशेष सत्राला संबोधित करताना केले.
फिनटेकने आर्थिक समावेशनाचा विस्तार करण्यास मदत केली असून भारतीयांचे जीवनमान सुधारण्यास हातभार लावला आहे. भारतातील फिनटेक क्षेत्राने घडवलेले परिवर्तन हे केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित नाही, तर त्याचा सामाजिक प्रभाव दूरगामी राहिला आहे. फिनटेकमुळे समांतर अर्थव्यवस्थेला खीळ घातली गेली असून वित्तीय सेवांच्या आघाडीवर गावे आणि शहरांमधील दरी कमी केली आहे.
हेही वाचा : ‘विस्तारा’चे एअर इंडियामध्ये १२ नोव्हेंबरला विलीनीकरण
ते म्हणाले की, भारतात सणासुदीचा हंगाम आहे, अर्थव्यवस्था आणि बाजारपेठांमध्येही उत्सवी वातावरण आहे. सकल देशांतर्गत उत्पादनांत (जीडीपी) वाढ होत असून भांडवली बाजार नवीन उच्चांक गाठत आहे. जगातील सर्वात मोठी सूक्ष्म-वित्त म्हणजेच ‘मायक्रोफायनान्स’ योजना प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत २७ लाख कोटी रुपयांची कर्जे वितरित करण्यात आली आहेत.
पाचशे टक्क्यांनी वाढ
या क्षेत्राला मदत करण्यासाठी सरकार धोरणात्मक पातळीवर विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच सुपरिणाम म्हणून गेल्या दशकभरात त्याने ३१ अब्ज डॉलरहून अधिक परदेशी गुंतवणूक आकर्षित केली आहे. गेल्या १० वर्षांत या क्षेत्रात आलेली गुंतवणूक आणि ‘एंजल टॅक्स’ रद्द करण्याचे सरकारने टाकलेले पाऊल यातून या परिसंस्थेच्या वाढीला बळ देणारे आहे. या काळात फिनटेक नवउद्यमी (स्टार्टअप्स) ५०० टक्क्यांनी वाढले आहेत.
सायबर फसवणुकीबाबत चिंता
पंतप्रधानांनी वाढलेल्या सायबर फसवणुकीबाबत चिंता व्यक्त केली. नियामकांना सायबर फसवणूक थांबवण्यासाठी आणि लोकांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी अधिक उपाययोजना करण्यास त्यांनी सूचित केले.
हेही वाचा : ‘आयएफएससी’मध्ये कंपन्यांच्या सूचिबद्धतेसाठी अट शिथिल
डिजिटल देयक प्रणालीमध्ये जागतिक पटलावर अग्रेसर
डिजिटल देयक प्रणालीमध्ये जागतिक पटलावर देश अग्रेसर आहे. हे फिनटेक क्षेत्रातील आधुनिक नवोन्मेष आणि नावीन्यपूर्ण उपायांमुळे साध्य झाले आहे. धोरणकर्ते, नियामक आणि नवोन्मेषक यांच्यातील सहयोग हा भारताच्या फिनटेक प्रवासाचा निर्णायक घटक आहे, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या नियामक चौकटीने नावीन्यपूर्ण व्यवसायांना सुव्यवस्थित रीतीने वाढ करण्यास मदत केली आहे. गेल्या एका वर्षात फिनटेक क्षेत्रातील अनेक कंपन्यांसोबत मध्यवर्ती बँकेने सतत संवाद राखला असून, नवसर्जनाच्या समर्थनासाठी नियामकांच्या वचनबद्धतेचे हे प्रतिबिंब आहे, असेही दास म्हणाले.