नवीन कार्यादेशामध्ये घट झाल्याने भारताच्या सेवा क्षेत्राच्या सक्रियतेत सरलेल्या नोव्हेंबरमध्ये घट दिसून आली, असे मासिक सर्वेक्षणातून मंगळवारी पुढे आले. सेवा क्षेत्राच्या वाढीने वर्षभरातील नीचांकी पातळी गाठली आहे.
भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक नोव्हेंबर महिन्यात ५६.९ गुणांवर नोंदला गेला. ऑक्टोबर महिन्यात तो ५८.४ गुणांवर होता. किमतीचा दबाव कमी झाल्याने या सेवा क्षेत्राला काही दिलासा मिळाला आहे. सकल मूल्यवर्धनात (जीव्हीए) सेवा क्षेत्राचा वाटा तब्बल ५४ टक्के आहे. दरम्यान, सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जुलै ते सप्टेंबर तिमाहीत सेवा क्षेत्राच्या वाढदरात ५.८ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये निर्देशांकात घसरण झाली असली तरी त्यातील वाढीचा कल मात्र कायम राहिला आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५० गुणांच्या खाली आकुंचनाचा निदर्शक मानला जातो.
महागाईचा दबाव कमी
सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यात महागाई कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. याचवेळी कच्च्या मालाचे दर कमी झाल्याने सेवा पुरवठादार कंपन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या शुल्कात वाढ केलेली नाही. त्यामुळे आगामी काळात नवीन कार्यादेशात वाढ होईल, अशी शक्यताही सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहे.
सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग तिसऱ्या तिमाहीत मंदावला आहे. मात्र, नवीन कार्यादेशात वाढ होऊन सेवा क्षेत्राला गती मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन विचार करता सध्याचा विस्ताराचा दर हा चांगला आहे. – पॉलियाना डी लिमा, अर्थतज्ज्ञ, एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स