पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतातील व्यापारी मालाची निर्यात या वर्षी ऑक्टोबरमध्ये ६.२१ टक्क्यांनी वाढून ३३.५७ अब्ज डॉलर झाली आहे, तरी या महिन्यात आयात-निर्यातीतील तफावत असलेली व्यापार तूट ३१.४६ अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे बुधवारी प्रसृत सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले. सणोत्सवाच्या या महिन्यात सोन्याच्या आयातीत वाढ झाल्यामुळे आयात मूल्य १२.३ टक्क्यांनी वाढून ६५.०३ अब्ज डॉलर नोंदवण्यात आले.

सरलेल्या ऑक्टोबरमध्ये सोन्याची देशांतर्गत मागणी वार्षिक तुलनेत ९५.५ टक्क्यांनी वाढून ७.२३ अब्ज डॉलरवर गेली. आंतरराष्ट्रीय किमती तापल्याने या महिन्यात खनिज तेल आयात खर्च देखील ८ टक्क्यांनी वाढून १७.६६ अब्ज डॉलरवर गेला, ज्याचा एकूण आयात मूल्यात १२.३ टक्क्यांनी वाढ करणारा परिणाम केला.

हेही वाचा… बजाज फायनान्सच्या डिजिटल कर्ज वितरणावर निर्बंध, नियमभंगामुळे रिझर्व्ह बँकेची कारवाई

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देशाची वस्तू व्यापार तूट २६.३१ अब्ज डॉलर होती. वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव एल. सत्य श्रीनिवास यांनी येथे पत्रकारांना माहिती देताना स्पष्ट केले की, ऑक्टोबरमधील व्यापार तूट (आयात आणि निर्यातीमधील फरक) आजवरची ‘सर्वाधिक’ आहे.

एकत्रितपणे, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत निर्यात सात टक्क्यांनी घसरून २४४.८९ अब्ज डॉलर झाली आहे, त्याचप्रमाणे आयातही ८.९५ टक्क्यांनी घसरून ३९१.९६ अब्ज डॉलर झाली आहे. सात महिन्यांच्या कालावधीत व्यापार तूट १४७.०७ अब्ज डॉलर पातळीवर आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत १६७.१४ अब्ज डॉलर होती. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये आतापर्यंत भारताची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात ४३७.५४ अब्ज डॉलर इतकी झाली असल्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १.६१ टक्क्यांनी घसरली आहे.

निर्यात-आयात घटक कोणते?

एप्रिल-ऑक्टोबर या आर्थिक वर्षात सोन्याची आयात २३ टक्क्यांनी वाढून २९.५ अब्ज डॉलर झाली आहे, तर खनिज तेलाची आयात १८.७२ टक्क्यांनी घसरून सुमारे १०० अब्ज डॉलर झाली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये निर्यात वाढीसाठी प्रमुख योगदान देणाऱ्या घटकांमध्ये मुख्यत्वे अभियांत्रिकी वस्तू, औषधी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृषी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सूती धागे, हातमाग उत्पादने, लोखंड, सिरॅमिक उत्पादने आणि काचेची वस्तू आणि मांस, डेअरी आणि पोल्ट्री उत्पादने, यांचा समावेश आहे. दुसरीकडे, ऑक्टोबरमध्ये उच्च वाढ नोंदवणाऱ्या आयात घटकांमध्ये डाळी (११२.२ टक्के), फळे आणि भाज्या (५३.४ टक्के), अलोह धातू (२१.२४ टक्के) आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू (२६ टक्के) यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In october trade deficit hits record high print eco news asj