नवी दिल्ली : देशभरात किरकोळ बाजारपेठांमध्ये दिवाळीच्या लक्ष्मीपूजनापर्यंतच्या कालावधीत आतापर्यंत ३ लाख ७५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली, असा अंदाज ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’(कॅट) या व्यापाऱ्यांच्या संघटनेने सोमवारी वर्तविला.
सणासुदीच्या काळात किरकोळ बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले. संपूर्ण देशाचा विचार करता, ‘कॅट’च्या अनुमानानुसार हे व्यवहार ३ लाख ७५ हजार कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. आगामी काळातील, गोवर्धन पूजा, भाऊबीज, छटपूजा आणि तुळशी विवाह या सणांच्या काळातील उलाढालीचा यात समावेश नाही. या काळात आणखी ५० हजार कोटी रुपयांची भर एकूण उलाढालीत पडेल, असे ‘कॅट’ने म्हटले आहे. संघटनेच्या मते, स्वदेशी उत्पादनांची मागणी आणि विक्री यावेळी मोठ्या प्रमाणात दिसून आली.
हेही वाचा… किरकोळ महागाई दरात दिलासादायी घसरण, ऑक्टोबरमध्ये ४.८७ टक्क्यांची चार महिन्यांतील नीचांकी पातळी
हेही वाचा… म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीला तिमाही गळती; सप्टेंबरअखेर तिमाहीत ३४,७६५ कोटींवर
याबाबत ‘कॅट’चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल म्हणाले, चिनी वस्तूंची बाजारपेठ कमी होत असून, त्यात यंदा दिवाळीच्या काळात १ लाख कोटी रुपयांची घसरण दिसून आली. मागील वर्षी दिवाळीच्या काळात चिनी वस्तूंनी ७० टक्के बाजारपेठ व्यापलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या आवाहनाला नागरिक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसोबत ग्राहकही स्वदेशी उत्पादनांना पसंती देत आहेत.