मुंबई : भांडवली बाजारात सूचिबद्ध होत असलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई कंपन्यांचे प्रमाण आणि त्यातून गुंतवणूकदारही भरभरून लाभ कमावत असल्याचे चित्र आहे. परिणामी चालू वर्षातील १६६ पैकी ५१ कंपन्यांच्या समभाग विक्रीला (आयपीओ) १०० पटींहून अधिक, तर १२ कंपन्यांच्या ‘आयपीओ’ला ३०० पटींहून अधिक प्रतिसाद प्राप्त झाल्याचे दलाली संस्था ‘फायर्स’च्या अहवालातून समोर आले आहे.
विद्यमान २०२३ सालातील सूचिबद्ध एसएमई कंपन्यांच्या एकत्रित बाजारभांडवलाने १ लाख कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला असून, यात नव्याने दाखल कंपन्यांचा सिंहाचा वाटा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये ‘आयपीओ’ घेऊन येणाऱ्या एसएमई कंपन्यांच्या संख्येत दुपटीने वाढली. उल्लेखनीय म्हणजे या छोट्या कंपन्यांच्या ‘आयपीओं’नी वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून भरभरून प्रतिसाद मिळविला. चालू वर्षात गुंतवणूकदारांकडून ४,४२५ कोटी रुपयांचा निधी उभारू पाहणारे एसएमई आयपीओ बाजारात दाखल झाले, प्रत्यक्षात गुंतवणूकदारांकडून कैकपटीने अधिक भरणा झाल्याने २.८ लाख कोटी रुपये गोळा झाले. अर्थात ६३ पटींहून अधिक समभागांसाठी मागणी नोंदवणारी झुंबड या ‘आयपीओं’नी अनुभवली.
हेही वाचा : परकीय गंगाजळी ६१६ अब्ज डॉलरवर
कहान पॅकेजिंग या एसएमई कंपनीने सप्टेंबर २०२३ ‘आयपीओ’ आणला होता, त्याला किरकोळ गुंतवणूकदारांकडून १०४२ पट प्रतिसाद लाभला. नेट अव्हेन्यू टेक्नॉलॉजीजला रिटेल विभागातून ७२१ पट अधिक आणि शिवरी स्पाइसेस अँड फूड्स ५१८ पट मागणी नोंदवण्यात आली. बरोबरीने, साएन्ट डीएलएमने ‘आयपीओ’पश्चात समभाग सूचिबद्धतेला ५८.८ टक्के अधिक परतावा दिला. समभागाचा सध्याचा बाजारभाव ‘आयपीओ’समयी विक्री किंमतीपेक्षा १४१.६ टक्के अधिक आहे. त्याचप्रमाणे सेन्को गोल्डने देखील पदापर्णाला २७.७ टक्के वाढ नोंदवली. तर सध्याची बाजारभाव मूळ विक्री किमतीपेक्षा १२७.३ टक्के अधिक आहे.
‘सेबी’चे करडी नजर
परताव्याचे लक्षणीय प्रमाण पाहता, सावधगिरी म्हणून बाजार नियामक ‘सेबी’ तसेच बाजारमंचांनीही सूचिबद्ध एसएमई कंपन्यांना अल्प-मुदतीच्या अतिरिक्त पाळत उपायांतर्गत (एएसएम) आणि ट्रेड फॉर ट्रेड (टीएफटी) उपायांतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर हे उपाय केवळ मुख्य बाजारमंचावर सूचिबद्ध कंपन्यांपुरते सीमित होते. एसएमई कंपन्यांच्या समभाग मूल्यातील लक्षणीय वाढीच्या पार्श्वभूमीवर ‘एएसएम’ निर्देशांअंतर्गत अल्पावधीसाठी अतिरिक्त पाळतीचा निर्णय घेतला गेला. समभागांतील वध-घट, त्यातील गुंतवणूकदारांचे केंद्रीकरण, तळच्या आणि वरच्या किंमत मर्यादेपर्यंत समभाग घरंगळण्याचे प्रमाण, नजीकच्या बंद भावांमधील मोठी तफावत अशा निकषांवर हा निर्णय घेतला जातो.
‘एसएमई आयपीओ’कडून परतावा किती?
हेही वाचा : वाणिज्य वापराच्या ‘एलपीजी’मध्ये ३९.५० रुपयांनी दरकपात; घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमती मात्र जैसे थे
‘प्राइम डेटाबेस’च्या माहितीनुसार, विद्यमान २०२३ सालात ‘एसएमई आयपीओ’ची लोकप्रियता इतकी वाढली की, त्यांनी सरासरी ६७ पट अधिक प्रतिसाद अनुभवला आहे. त्यांच्यापैकी काहींना तर ७१३ पट प्रतिसाद मिळाला आहे. २०२३ मध्ये सूचिबद्ध झालेल्या १०७ एसएमई कंपन्यांच्या समभागांनी आतापर्यंत सरासरी ७७ टक्के परतावा दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. काही समभागांनी केवळ ४ ते ५ महिन्यांत चार पटीने परतावा मिळवून दिला आहे. १६६ पैकी केवळ १९ कंपन्यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.
हेही वाचा : Gold-Silver Price on 23 December 2023: सोन्याला आज पुन्हा झळाळी, तर चांदीही चमकली, पाहा आजचा भाव
आयपीओंचे वर्ष
वर्ष २०२३ मध्ये, मुख्य बाजार मंचावर, ५० कंपन्यांनी समभाग विक्री केली, त्यातून एकूण ४४,७४४ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला. त्यापैकी १३ कंपन्यांनी १,००० कोटी ते ४,५०० कोटी रुपयांच्या दरम्यान निधी उभारणी केली. आकारमानानुसार मॅनकाइंड फार्माचा सर्वात मोठा ‘आयपीओ’ होता, ज्यायोगे ४,३२६ कोटी रुपये उभारले गेले. गुंतवणूकदारांनी त्याला १५.३ पट भरणा करणारा प्रतिसाद दिला होता.