मुंबई : आघाडीचे डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या समभागांची कामगिरी जगातील अन्य कंपन्यांच्या भव्य प्रारंभिक समभाग विक्रीच्या तुलनेत सर्वात सुमार राहिली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये त्या समयीच्या सर्वात मोठय़ा आकाराच्या भागविक्रीसह भांडवली बाजारात प्रवेश केलेल्या ‘पेटीएम’च्या समभागाने गुंतवणूकदारांना ७८ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपनीने गेल्या वर्षी भांडवली बाजारातून समभागांच्या विक्रीतून १८,३०० कोटी रुपयांचा निधी उभारला. या भागविक्रीसाठी जवळपास दुप्पट (१.८९ पट) भरणा गुंतवणूकदारांकडून केला गेला. म्हणजे कंपनीने प्रारंभिक विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या ४.८३ कोटी समभागांच्या तुलनेत ९.१४ कोटी समभागांसाठी बोली लावणारे अर्ज आले होते. जगभरातील इतर देशांच्या भांडवली बाजारात झालेल्या कंपन्यांच्या भव्यदिव्य ठरलेल्या प्रारंभिक समभाग विक्रीशी तुलना करता पेटीएमच्या कामगिरीने गुंतवणूकदारांना सर्वाधिक निराश केले आहे.

स्पेनच्या ‘बँकिया’ या कंपनीनेदेखील गुंतवणूकदारांना ८२ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. या कंपनीने भांडवली बाजारातून ४.८ अब्ज डॉलरचा निधी उभारला होता. त्यानंतर पेटीएमने ७८ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. त्यापाठोपाठ संयुक्त अरब अमिरातीमधील ‘डीपी वर्ल्ड’ या कंपनीने उणे ७४ टक्के परतावा दिला. त्यांनी बाजारातून ५ अब्ज डॉलरहून अधिक निधी उभारला होता. हाँगकाँगमधील मोठी प्रारंभिक समभाग विक्री ठरलेल्या ‘बिलीबिली’ या कंपनीने ३ अब्ज डॉलरचा निधी उभारला, मात्र तिनेही गुंतवणूकदारांना ७२ टक्के उणे परतावा दिला. ‘न्यू वर्ल्ड रिसोर्सेस’ या ब्रिटनच्या कंपनीने उणे ७१ टक्के परतावा दिला आहे. प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून तिने २.५ अब्ज डॉलरचा निधी उभा केला होता.

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी २,१५० रुपये किमतीला पेटीएमचा समभाग मिळविला. मात्र वर्षभराच्या अवधीनंतर हा समभाग ५०० रुपयांच्या खाली आला आहे. परिणामी, गुंतवणूकदारांच्या पदरी ७८ टक्क्यांहून अधिक तोटा आला आहे. मुंबई शेअर बाजारात गुरुवारच्या व्यवहारात समभाग ११.२५ रुपयांच्या घसरणीसह ४११.०५ रुपयांवर बंद झाला. सत्रात समभागाने ४३९.६० या ऐतिहासिक नीचांकी पातळीला स्पर्श केला.

गुंतवणूकदारांच्या पदरी तोटा देणारे भव्य ‘आयपीओं’

कंपनी/ देश      ‘आयपीओं’चा आकार       गुंतवणुकीत तोटा  

बँकिया (स्पेन)   ४.८ अब्ज डॉलर     – ८२ टक्के   

पेटीएम (भारत)  २.४ अब्ज डॉलर    – ७५ टक्के  

डीपी वर्ल्ड (यूएई)    ५ अब्ज डॉलर       – ७४ टक्के   

बिलीबिली (हाँगकाँग) ३ अब्ज डॉलर       – ७२ टक्के 

न्यू वर्ल्ड रिसोर्सेस (ब्रिटन)    २.५ अब्ज डॉलर      – ७१ टक्के

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the capital market paytm weakest performance among major ipos worldwide ysh