मुंबई : देशांतर्गत तसेच बाहेरील अनुकूल घटनाक्रमाने भांडवली बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक ऐतिहासिक उच्चांकी स्तरावर पोहोचले असताना, २०२३ साल मावळण्यापूर्वी प्राथमिक बाजारात अनेक नवीन कंपन्यांची ‘आयपीओ’ प्रस्तावांसह गजबजही वाढली आहे. बाजार तेजीने उत्साह संचारलेल्या गुंतवणूकदारांकडून पुढील आठवड्यात १८ ते २२ डिसेंबरदरम्यान सात कंपन्या साधारण ५,३०० कोटींचा निधी उभारू पाहत आहेत, तर चार कंपन्यांच्या समभाग या आठवड्यात बाजारात सूचिबद्ध होतील.
दिवाळीपश्चात दोन आठवड्यांच्या स्तब्धतेनंतर, दाखल झालेल्या टाटा टेक्नॉलॉजी, इरेडा या कंपन्यांच्या भागविक्रींना गुंतवणूकदारांकडून उदंड प्रतिसाद मिळून, त्यात कैकपट अधिक भरणा झाला. शिवाय या कंपन्यांच्या समभागांच्या दमदार सूचिबद्धतेने गुंतवणूकदारांना अगदी काही दिवसांमध्ये दुपटीहून अधिक नफाही दाखवला. त्यापाठोपाठ स्टेशनरी उत्पादनातील डॉम्स इंडस्ट्रीज आणि गृह वित्त क्षेत्रातील कंपनी इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन यांच्या प्रत्येकी १,२०० कोटी रुपयांची उभारणी करणाऱ्या भागविक्रींना गुंतवणूकदारांकडून दमदार प्रतिसाद मिळविला. शुक्रवार, १५ डिसेंबरला समाप्त झालेल्या या भागविक्रींमध्ये दसपटींहून अधिक अर्ज भरणा झाला आहे.
हेही वाचा : तुमच्या कर्जाचा हप्ता वाढणार…’या’ बँकेचे कर्ज महागले
आयनॉक्स इंडिया
अपारंपरिक ऊर्जा स्रोत व इंधनांसाठी आवश्यक क्रायोजेनिक टाक्या आणि उपकरणांची उत्पादक आयनॉक्स इंडिया या बडोदेस्थित कंपनीची १,४५९.३२ कोटी रुपयांचा निधी उभारू पाहणारी भागविक्री १४ ते १८ ऑक्टोबरदरम्यान खुली आहे. प्रत्येकी ६२७-६६० रुपये किंमतीला कंपनीच्या समभागांशी बोली लावता येईल. भागविक्रीच्या पहिल्या दिवशीच कंपनीने विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या समभागांच्या तुलनेत पावणेतीन पट अधिक मागणी नोंदवणारे अर्ज मिळविले.
हॅपी फोर्जिंग
लुधियानास्थित वाणिज्य वापराच्या वाहनांसाठी क्रॅमशाफ्ट आणि अन्य महत्त्वाच्या सामग्रींच्या निर्मात्या आणि जागतिक ओईएम पुरवठादार असलेल्या हॅपी फोर्जिंग लिमिटेडने १९ ते २१ डिसेंबर या दरम्यान प्रारंभिक भागविक्रीतून १,००८ कोटी रुपये उभारणार आहे. त्यासाठी कंपनीने प्रति समभाग ८०८ रुपये ते ८५० रुपये असा किंमतपट्टा निर्धारीत केला आहे.
हेही वाचा : सर्वसामान्यांना महागाईची झळ, सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ; मुंबई-पुण्यात भाव किती?
क्रेडो ब्रॅण्ड्स मार्केटिंग
मुफ्ती जीन्स आणि त्याच नाममु्द्रेने पुरुष परिधानांची निर्मिती करणाऱ्या क्रेडो ब्रॅण्ड्स मार्केटिंग लिमिटेड ही मुंबईस्थित कंपनी १९ ते २१ डिसेंबरदरम्यान आयपीओसह बाजारात उतरत आहे. प्रति समभाग २६६ ते २८० रुपये किंमत पट्ट्याने होणाऱ्या या भागविक्रीतून कंपनीला ५५० कोटी रुपयांचा निधी उभारला जाणे अपेक्षित आहे.
मुत्थूट मायक्रोफिन
मुत्थूट पाप्पाचन समूहाचा अंग असलेली देशातील पाचव्या क्रमांकाची लघु वित्त क्षेत्रातील कंपनी मुत्थूट मायक्रोफिन तिच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांना १८ ते २० डिसेंबरदरम्यान आजमावेल. कंपनी या माध्यमातून ९६० कोटी रुपये उभारू पाहत असून, त्यासाठी २७७ ते २९१ रुपये प्रति समभाग किंमतपट्टा तिने निर्धारीत केला आहे.
सूरज इस्टेट डेव्हलपर्स
विशेषतः दक्षिण-मध्य मुंबईत निवासी तसेच वाणिज्य मालमत्तांच्या विकसनांत अग्रेसर सूरज इस्टेट डेव्हलपर्स ही कंपनी १८ ते २० डिसेंबरदरम्यान सुरू राहणाऱ्या प्रारंभिक भागविक्रीतून ४०० कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने त्यासाठी प्रति समभाग ३४० ते ३६० रुपये किंमतपट्टा निर्धारीत केला आहे.
हेही वाचा : “या कामातून एका दिवसात अडीच लाख कमाई शक्य”, नारायण मूर्ती यांचा नवा Video चर्चेत, स्वतः दिलं स्पष्टीकरण
मोतीसन्स ज्वेलर्स
जयपूरस्थित सराफ पेढी आणि मौल्यवान खडे तसेच कुंदन पोलकी आभूषणांसाठी प्रसिद्ध मोतीसन्स ज्वेलर्स १८ ते २० डिसेंबर या दरम्यान सुरू राहणाऱ्या भागविक्रीतून १५१ कोटी रुपये उभारणार आहे. कंपनीने प्रति समभाग ५२ ते ५५ रुपये किंमतपट्टा निर्धारीत केला आहे.
आझाद इंजिनीयरिंग
संरक्षण व हवाई क्षेत्र, ऊर्जा तसेच तेल व वायू उद्योगांसाठी जागतिक मूळ उपकरण उत्पादकांना (ओईएम) घटकांचा पुरवठा करणारी आणि जनरल इलेक्ट्रिक, हनीवेल इंटरनॅशनल, मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज, सीमेन्स, ईटन एरोस्पेस आणि मान एनर्जी सोल्युशन्स या सारख्या दिग्गज कंपन्यांचा ग्राहकवर्गात समावेश असलेल्या आझाद इंजिनीयरिंग या हैदराबादस्थित कंपनीचा २० ते २२ डिसेंबर दरम्यान आयपीओ खुला होत आहे. एकूण ७४० कोटी रुपये उभारले जाणे अपेक्षित असलेल्या या भागविक्रीसाठी प्रति समभाग ४९९ रुपये ते ५२४ रुपयांदरम्यान बोली लावता येईल.