छत्रपती संभाजीनगर: प्रधानमंत्री ‘मुद्रा’ योजनेच्या थकीत कर्जाच्या प्रमाणात गेल्या तिमाहीत पुन्हा वाढ झाली असून, आता हे प्रमाण वितरित कर्जाच्या १२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. योजनेतील ४५,४६९ खात्यांतून ५,५२७ कोटी रुपये थकविले गेले असल्याचा बँकांचा अहवाल असून, ही माहिती राज्यस्तरीय बँकर्स समितीपुढे ठेवली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरलेल्या सोमवारी, ९ डिसेंबर रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात, राज्यात आतापर्यंत ‘मुद्रा’अंतर्गत ३० लाख २८ हजार १३२ खात्यांना कर्ज दिले गेले असून, ती रक्कम चार लाख ५५ हजार २२१ कोटी रुपये एवढी आहे. सर्वाधिक थकीत कर्जाचे शेकडा प्रमाण परभणी जिल्ह्यात ३२ टक्के, जालना, हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी २१ टक्के आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात थकीत कर्जाचे प्रमाण वाढले असल्याचे अहवाल राज्यस्तरीय बँकर्स समितीसमोर ठेवण्यात आले आहेत. ही बैठक मुख्यमंत्री व मुख्य सचिवांच्या उपस्थितीमध्ये घेण्याचे प्रस्तावित आहे.

हेही वाचा >>>Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर

केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकाराने बँकांनी दिलेल्या लाभार्थी योजनांचा आढावा बँकर्स समितीमध्ये घेतला जातो. ‘मुद्रा’ योजना २०१४ मध्ये सुरू झाल्यानंतर शिशू, किशोर आणि तरुण या तीन विभागांमध्ये अनुक्रमे एक लाख, पाच आणि दहा लाख रुपयांपर्यंतची कर्जे वितरित केली जातात. पहिल्या काही वर्षांत बोगस कोटेशन देऊन कर्ज मिळविण्याचे प्रमाण या योजनेत अधिक होते. विशेषत: मराठवाड्यात बोगस कर्ज घेणाऱ्यांच्या ठगबाज टोळ्या कार्यरत होत्या. मराठवाडा वगळता अन्य भागांत ‘मुद्रा’तून घेतलेली कर्जे थकीत ठेवण्याचे प्रमाण आठ आणि १४ टक्के एवढेच आहे. मात्र, मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात कर्ज थकिताचे शेकडा प्रमाण ३२ टक्के एवढे आहे. परभणी जिल्ह्यात ३४,७२३ खातेदारांकडे २४४ कोटी रुपयांचे कर्ज थकलेले आहे. जालना जिल्ह्यात १५८ तर हिंगोलीमध्ये ८७ कोटी रुपयांची कर्जे थकलेली आहेत.

हेही वाचा >>>सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा

थकीत कर्जाची रक्कम मुंबईत अधिक

थकीत कर्जाचा टक्का मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत अधिक असला, तरी थकीत कर्ज रकमेत मुंबई जिल्हा अग्रणी आहे. मुंबईतील ४०,८९८ खातेदारांनी ३५७ कोटी रुपयांचे कर्ज थकविले आहे. मुंबईत १ लाख ८९ हजार ३१९ जणांना २,४१३ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. मुंबई उपनगरात एक लाख ८५ हजार जणांना २,९२४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. येथील थकीत कर्जाचा टक्का मात्र मराठवाड्याच्या तुलनेत निम्म्याहून कमी म्हणजेच ११ टक्के आहे. सोलापूर व ठाणे जिल्ह्यात हे प्रमाण अनुक्रमे १३ व १४ टक्के एवढे आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in outstanding loans under pradhan mantri mudra yojana print eco news amy