भारतात श्रीमंत वर्गात झपाट्याने वाढ होत आहे. भारतीय अर्थव्यवस्था जसजशी प्रगती करीत आहे, तसतशी भारतीयांची समृद्धीही वाढत आहे. येत्या काही वर्षात भारतातील श्रीमंत वर्ग झपाट्याने वाढणार असून, चांगली कमाई करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढणार आहे, असा विश्वास जागतिक बँकिंग समूह गोल्डमन सॅचने व्यक्त केला आहे.
गोल्डमन सॅचने शुक्रवारी यासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला. ते म्हणाले की, येत्या तीन वर्षांत भारतातील समृद्ध लोकांची संख्या १०० दशलक्ष म्हणजेच १० कोटी होईल. रिपोर्ट तयार करताना गोल्डमन सॅक्सने अशा समृद्ध भारतीयांच्या श्रेणीतील लोकांना समाविष्ट केले होते की, ज्यांची वार्षिक कमाई १० हजार डॉलर्सपेक्षा जास्त असेल. भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे ८ लाख ३० हजार रुपये होते.
६ कोटी भारतीय श्रीमंत झाले
गोल्डमन सॅचने अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत वार्षिक ८.३० लाख रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या भारतीयांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये भारतात २.४ कोटी लोक होते जे वार्षिक ८.३० लाख रुपयांपेक्षा जास्त कमावत होते. या श्रेणीतील लोकांची संख्या आता ६ कोटी झाली आहे. याचाच अर्थ गेल्या ८ वर्षांत ८.३० लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांची संख्या अडीच पटीने वाढली आहे.
समृद्धीमुळे प्रीमियम वस्तूंची मागणी वाढणार
भारताच्या प्रचंड लोकसंख्येच्या तुलनेत १० हजार डॉलर्सपेक्षा जास्त कमावणाऱ्या लोकांची संख्या अजूनही खूपच कमी आहे. हे लोकसंख्येच्या फक्त ४.१ टक्के आहे. अहवालातील अंदाजानुसार, येत्या काही वर्षांत टक्केवारी सुधारू शकते. गोल्डमन सॅक्स म्हणतात की, भारतात श्रीमंत लोकांची लोकसंख्या जसजशी वाढत जाईल, तसतशी प्रीमियम वस्तूंची मागणीही देशात वाढेल.
या कारणांमुळे भारतीयांची समृद्धी वाढली
गोल्डमन सॅचच्या ‘समृद्ध भारत’ रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षांत भारताला अनेक घटकांकडून मदत मिळाली आहे. जागतिक बँकिंग फर्मच्या मते, गेल्या दशकात देशाची वेगवान आर्थिक वाढ, स्थिर चलनविषयक धोरण आणि उच्च पत वाढ यामुळे भारतीयांची भरभराट झाली आहे. भारताचे दरडोई उत्पन्न सध्या सुमारे २१०० डॉलर म्हणजेच वार्षिक १.७४ लाख रुपये आहे.