नवी दिल्ली: डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल कर दुपटीने वाढवून प्रति लिटर एक रुपया, तर देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्यांच्या नफ्यावरील अतिरिक्त करात सलग पाचव्या कपातीची घोषणा सोमवारी केली. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन अर्थात ओएनजीसीसारख्या कंपन्यांद्वारे उत्पादित खनिज तेलावरील कर त्यामुळे आता ४,४०० रुपये प्रति टनांवरून ३,५०० रुपये प्रति टनांवर आला आहे.
सरकारने डिझेलच्या निर्यातीवरील कर ५० पैशांनी वाढवून १ रुपया प्रति लिटर केला. विमानाो इंधन अर्थात एटीएफ निर्यातीवरील कर विद्यमान महिन्यात ४ मार्चला रद्द करण्यात आला होता. फेरआढाव्याअंती निश्चित केलेले नवीन दर मंगळवारपासून लागू झाले आहेत. केंद्राने गेल्या वर्षी १ जुलैपासून ‘विंडफॉल करा’ची अंमलबजावणी सुरू केली असून, या नवीन कराच्या घोषणेवेळीच दर पंधरवड्याला तेलाच्या जागतिक पातळीवरील किमतींचा अंदाज घेऊन त्या संबंधाने फेरआढावा घेण्यात येईल, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले होते.
अस्थिर भू-राजकीय परिस्थिती आणि खनिज तेलातील चढ-उतरांमुळे विंडफॉल कराची वसुली किती काळ चालू राहील हे सांगणे कठीण असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते. तर सरकारला विद्यमान आर्थिक वर्षात विंडफॉल कराच्या माध्यमातून सुमारे २५००० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची आशा आहे.