पीटीआय, नवी दिल्ली : मारुती सुझुकी इंडिया कंपनीतील जपानच्या सुझुकी मोटर कंपनी लि. या पालक कंपनीला १ कोटी २३ लाख अतिरिक्त समभागांच्या वितरणातून भागभांडवली हिस्सेदारी सध्याच्या ५६.४८ टक्क्यांवरून ५८.१९ टक्क्यांपर्यंत मारुती सुझुकी इंडियाच्या संचालक मंडळाने शुक्रवारी झालेल्या बैठकीने मंजुरी दिली.
मारुती सुझुकी इंडियाने भांडवली बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने सुझुकी मोटरला अतिरिक्त १ कोटी २३ लाख २२ हजार ५१४ कोटी समभागांच्या वितरणास मंजुरी दिली आहे. यासाठी प्रति समभाग मूल्य १०,४२० रुपये ठरविण्यात आले आहे. सुझुकी मोटारकडून मारुती सुझुकीने गुजरातमधील उत्पादन प्रकल्प १२ हजार ८०० कोटी रुपयांना विकत घेतला आहे. त्याचा मोबदला म्हणून हे अतिरिक्त समभाग पालक कंपनीला देण्यात येणार आहेत.
मारुतीने जुलै महिन्यात गुजरातमधील उत्पादन प्रकल्प पालक कंपनीकडून खरेदी करण्याचे जाहीर केले होते. सुझुकीने २०१४ पासून उत्पादन प्रकल्पात १८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प २०१७ पासून सुरू झाला असून, त्याची ७ लाख ५० हजार मोटारींची वार्षिक उत्पादन क्षमता आहे. उत्पादन प्रकल्प पूर्णपणे ताब्यात आल्यानंतर उत्पादनावरील पकड आणखी चांगली होईल, असा मारुतीचा दावा आहे.
मुंबई शेअर बाजारात शुक्रवारच्या सत्रात मारुतीचा समभाग २७.१५ रुपयांनी वधारून, १०,५१५.६५ रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या समभागाच्या बाजारभावानुसार कंपनीचे ३,१७,६५६ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.
हेही वाचा : Gold-Silver Price on 25 November 2023: सोने महागलं की ग्राहकांना दिलासा? महाराष्ट्रातील ‘या’ शहरातील दर पाहा
वाहन विक्रीचा ऑक्टोबरमध्ये उच्चांक
मारुती सुझुकीने ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी वाहन विक्री केली. कंपनीने १ लाख ९९ हजार २१७ वाहनांची विक्री केली. याचबरोबर कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये निर्यातीतही ७ टक्के वाढ नोंदविली आहे. कंपनीने यंदा एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत मागील वर्षीपेक्षा ८ टक्के जास्त वाहन विक्री केली आहे.