नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन संसदेने नुकतीच मंजुरी दिल्यांनतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मुक्त व्यापार कराराची अंमलबजावणी येत्या २९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या करारामुळे उभयतांमधील द्विपक्षीय व्यापार सध्याच्या २७.५ अब्ज डॉलरवरून येत्या पाच वर्षांत ४५ ते ५० अब्ज डॉलरवर पोहोचण्याची आशा आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी, त्याला ऑस्ट्रेलियाच्या संसदेकडून मंजुरी आवश्यक होती. ही मंजुरी दिली गेल्याचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी ट्वीट करून घोषित केले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. चालू वर्षांत २ एप्रिलला भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारावर उभयतांकडून स्वाक्षरी करण्यात आली होती.
भारताने एका दशकानंतर विकसित देशासोबत मुक्त व्यापार करार केला असून यामुळे कापड व वस्त्रप्रावरणे, काही कृषी आणि मत्स्य उत्पादने, चामडे, पादत्राणे, फर्निचर, क्रीडा सामग्री, दागिने आणि यंत्रसामग्रीसह भारतातील ६,००० हून अधिक व्यापक क्षेत्रांसाठी ऑस्ट्रेलियाच्या बाजारपेठेत शुल्कमुक्त प्रवेश खुला होईल.
मुक्त व्यापार करार २९ डिसेंबर २०२२ पासून अमलात येणार असल्याने ऑस्ट्रेलियन व्यावसायिकांना आणि ग्राहकांना नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे, असे ऑस्ट्रेलियाचे वाणिज्य आणि पर्यटनमंत्री डॉन फॅरेल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या कराराअंतर्गत, ऑस्ट्रेलिया पहिल्या दिवसापासून भारताला त्याच्या निर्यातीपैकी ९६.४ टक्के (मूल्यानुसार) शुल्कमुक्त प्रवेश देत आहे. यामध्ये अशी अनेक उत्पादने आहेत, ज्यांवर सध्या ऑस्ट्रेलियात ४-५ टक्के सीमा शुल्क आकारले जाते.
दोन्ही देशांदरम्यान व्यापार..
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ऑस्ट्रेलियाला भारताकडून झालेली वस्तूंची निर्यात ८.३ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती आणि त्या देशातून भारताची आयात ही एकूण १६.७५ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी आहे.