पीटीआय, नवी दिल्ली : सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात भारताच्या निर्यातीत ८.८ टक्क्यांनी घसरण होत ती ३३.८८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत ३७.१५ अब्ज डॉलरची निर्यात नोंदवण्यात आली होती.
दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे, देशाच्या आयातीत देखील ८.२१ टक्क्यांची घसरण झाली आहे. ती सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात ५१.३१ अब्ज डॉलरवर पोहोचली. जी गत वर्षी म्हणजेच फेब्रुवारी २०२२ मध्ये ५५.९ अब्ज डॉलर होती. मात्र जानेवारी २०२३ च्या तुलनेत आयातीमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात आयात ५०.६६ अब्ज डॉलर होती.
वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारीमध्ये सेवा आणि व्यापारी मालाची निर्यात ७.८ टक्क्यांनी वाढली आहे. सेवा क्षेत्रातील निर्यात वर्षभर जवळपास ३७ टक्क्यांनी वाढून ३६.८५ अब्ज डॉलर झाली आहे, तर आयात १२ टक्क्यांनी वाढून १४.५५ अब्ज डॉलर नोंदवण्यात आली. तर गेल्या वर्षी याच कालावधीतील ३७.१५ अब्ज डॉलरच्या तुलनेत फेब्रुवारी २०२३ मध्ये व्यापारी मालाची निर्यात ३३.८ अब्ज डॉलपर्यंत घसरली, असे आकडेवारीवरून दिसून येते.
चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत पेट्रोलियम उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये मोबाइल निर्यात ५० टक्क्यांनी वाढली आहे, जानेवारी अखेरीस ती ८.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी दिली. केंद्र सरकारने विद्यमान आर्थिक वर्षांत ७५० अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तू आणि सेवा निर्यातीचे लक्ष्य ठेवले आहे, जे गेल्या आर्थिक वर्षांत नोंदवलेल्या ६७६ अब्ज डॉलरच्या एकत्रित निर्यातीच्या तुलनेत ११ टक्के अधिक आहे.
व्यापार तुटीत घसरण
एकीकडे देशाची निर्यात घसरली असली तरी आयातीमध्ये देखील घसरण झाली आहे. परिणामी फेब्रुवारीत व्यापार तूट १७.४३ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिली आहे. विद्यमान आर्थिक वर्षांतील एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान देशाची एकूण निर्यात ७५ टक्क्यांनी वाढून ४०५.९४ अब्ज डॉलर झाली आहे. याच कालावधीत आयात १८.८२ टक्क्यांनी वाढून ६५३.४७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. निर्यात आणि आयात यातील तफावत म्हणजे व्यापार तूट २४७.५३ अब्ज डॉलर नोंदवली गेली आहे.