पीटीआय, नवी दिल्ली
भारताच्या परकीय चलन गंगाजळीत वाढ झाली असून, २८ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्याच्या अवधीत गंगाजळी ४.५३ अब्ज डॉलरने वाढून ५८८.७८ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, असे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून पुढे आले. त्या आधीच्या आठवड्यात गंगाजळी
२.१६ अब्ज डॉलरने आटत ५८४.२४ अब्ज डॉलर नोंदण्यात आली होती.
ऑक्टोबर २०२१ मध्ये परकीय गंगाजळीने ६४५ अब्ज डॉलरची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र मुख्यत: जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडींमुळे निर्माण झालेल्या दबावामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाला सावरण्यासाठी मध्यवर्ती बँकेने परकीय गंगाजळी खुली केली होती.