मुंबई: भारताच्या परकीय चलन गंगाजळीत वाढ झाली असून, २७ सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात गंगाजळी ७०४.८८ अब्ज डॉलर या सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचल्याचे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. सरलेल्या आठवड्यात त्यात १२.५८ अब्ज डॉलरची भर पडली, तर त्या आधीच्या आठवड्यात गंगाजळीमध्ये २.८ अब्ज डॉलरची भर पडून तिने ६९२.२९ अब्ज डॉलरची उच्चांकी पातळी गाठली होती.

चीन, जपान आणि स्वित्झर्लंडनंतर ७०० अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी असणारी भारत ही जगातील चौथी अर्थव्यवस्था आहे. बाह्य व्यापार आणि आयातीच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या आपण सुस्थितीत आहोत, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले. गंगाजळीने ७०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिवाय गंगाजळीमध्ये एका आठवड्यात १२.५८ अब्ज डॉलरची भर देखील आतापर्यंतची सर्वोच्च साप्ताहिक वाढ दर्शवणारी आहे. सोन्याचा साठा २.१८ अब्ज डॉलरने वाढून ६५.७९ अब्ज डॉलर झाला आहे, असे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे.

हेही वाचा >>> सेवा क्षेत्रही मरगळीकडे! सप्टेंबरचा ‘पीएमआय’ १० महिन्यांच्या नीचांकावर

वर्ष २०१३ पासून देशाच्या परकीय चलन साठ्यात निरंतर वाढ सुरू आहे. २०२४ मध्ये त्यात आतापर्यंत ८७.६ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, जी मागील वर्षभरात जवळपास ६२ अब्ज डॉलर नोंदवली गेली होती.

ताजा प्रवाह लक्षात घेता, मार्च २०२६ पर्यंत देशाची परकीय चलन गंगाजळी ७४५ अब्ज डॉलरपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे. सुदृढ गंगाजळीमुळे अस्थिर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आकस्मिक बाह्य जोखमींविरूद्ध संरक्षक कवच मजबूत बनेल आणि चलन व्यवस्थापनात रिझर्व्ह बँकेलाही अधिक लवचिकता मिळेल. या स्वागतार्ह घडामोडीचे चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रणाच्या दृष्टीनेही सुपरिणाम दिसून येतील.- मनोरंजन शर्मा, अर्थतज्ज्ञ, इन्फोमेरिक्स रेटिंग्ज

परकीय गंगाजळी म्हणजे काय?

देशाला विविध मार्गांनी कमी-अधिक प्रमाणात परकीय चलन प्राप्त होत असते. त्याच्या संचयाला परकीय गंगाजळी असे संबोधले जाते. रिझर्व्ह बँकेकडे परकीय गंगाजळी मुख्यतः अमेरिकी डॉलर, युरो, पौंड स्वरूपात तसेच सोन्याच्या रूपात साठवली जाते. परंतु हा संचय तसाच न ठेवता अमेरिका आणि इतर देशांनी जारी केलेल्या सरकारी रोख्यांमध्ये गुंतविला जातो. जेणेकरून त्यावर व्याज स्वरूपात उत्पन्न मिळते. मात्र उत्पन्न मिळविणे हा मुख्य उद्देश नसून परकीय गंगाजळी देशाच्या अर्थव्यवस्थेत आपत्कालीन स्थितीत संरक्षक कवच म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असते.