पीटीआय, नवी दिल्ली
देशाचा परकीय चलन साठा ७ फेब्रुवारी रोजी सरलेल्या आठवड्यात ७.६५ अब्ज डॉलरने वधारून ६३८.२६ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी स्पष्ट केले. एकीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयांची नीचांकी घसरण सुरू असून गेल्या काही महिन्यांमध्ये परकीय गंगाजळीला गळती लागली होती. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, सलग तिसऱ्या आठवड्यात परकीय चलन साठ्यात वाढ झाली आहे, ३१ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा १.०५ अब्ज डॉलरने वाढून ६३०.६० अब्ज डॉलरवर पोहोचला होता.

शुक्रवारी अमेरिकी चलन डॉलरमधील घसरणीमुळे रुपयाचे मूल्य सुधारले आणि डॉलरच्या तुलनेत ते १२ पैशांनी वाढून ८६.८१ वर स्थिरावले. तथापि, खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सतत सुरू असलेली भांडवली बाजारातील विक्री यामुळे रुपयाच्या मजुबतीला मर्यादा पडल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. रुपयातील अस्थिरता कमी करण्यास मदत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या चलन बाजारातील हस्तक्षेपामुळे अलिकडे तिच्या डॉलर गंगाजळीत घसरण दिसून येत होती. गेल्या वर्षी सप्टेंबर २०२४ अखेर परकीय गंगाजळी ७०४.८८ अब्ज डॉलरच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली होती.

Story img Loader