Estimated GDP Of India In 2025-2026: जागतिक अनिश्चितता असूनही, २०२५ ते २०३१ या कालावधीत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) सरासरी ६.७% दराने वाढण्याचा अंदाज क्रिसिलने व्यक्त केला आहे. क्रिसिलच्या मते, आगामी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जीडीपी ६.५% राहण्याचा अंदाज आहे. सामान्य मान्सून, आवाक्यात असणारी महागाई आणि सुलभ चलन धोरण अशा अनेक घटकांमुळे भारतीय विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

जागतिक आव्हाने कायम राहण्याची शक्यता

क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ धर्मकीर्ती जोशी म्हणाले की, “जागतिक आव्हाने संपली आहेत असे मला वाटत नाही. आता परिस्थिती तात्पुरती बदलत असल्याचे दिसत आहे. पण, आपण परिस्थिती पूर्णपणे सुधारण्याची वाट पाहिली पाहिजे. काही उद्योग क्षेत्रे अमेरिकेच्या व्यापार धोरणांमधील संभाव्य बदलांबाबत अधिक संवेदनशील असतात. अति आयात शुल्क किंवा व्यापार निर्बंधांमुळे कापड, वाहनांचे सुटे भाग, हिरे आणि दागिने या उद्योग क्षेत्रांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण, अमेरिकेत आरोग्यसेवा उत्पादनांची मागणी जास्त असल्याने औषध उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. क्रिसिल इंटेलिजेंसचे वरिष्ठ संचालक मिरेन लोढा म्हणाले की, अमेरिका औषधांपेक्षा आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित करेल याची शक्यता कमी आहे.

उत्पादन क्षेत्र

विकासाच्या मुख्य घटकांपैकी उत्पादन क्षेत्र हे एक आहे. जे आर्थिक वर्ष २०२५ ते आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत दरवर्षी सरासरी ९.०% वाढण्याची अपेक्षा आहे, जे कोरोना महामारीच्या आधीच्या दशकात सरासरी ६% होते.

भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात उत्पादन क्षेत्राचा वाटा आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सुमारे १७% होता. २०% पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. उत्पादन क्षेत्रात भक्कम विकास होण्याचा अंदाज असूनही, सेवा क्षेत्र हे भारताच्या आर्थिक विस्ताराचे प्रमुख चालक राहण्याची अपेक्षा आहे.

डिसेंबर तिमाहीची आकडेवारी

सध्याच्या कठीण जागतिक परिस्थितीत, चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.२ टक्के होता. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी ६.२ टक्के वाढला, तर जुलै-सप्टेंबर २०२४ मध्ये विकास दर ५.६ टक्के होता. अशाप्रकारे, जीडीपी वाढ सात तिमाहींमधील सर्वात कमी पातळीपासून सावरण्यात यशस्वी झाली आहे. पण, गेल्या तिमाहीतील वाढीचा आकडा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंदाजापेक्षा कमी आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ६.८ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता.

यासोबरोबर, सरकारने आता पूर्ण आर्थिक वर्षासाठी जीडीपीचा अंदाज किरकोळ वाढवून ६.५ टक्के केला आहे, तर मागील अंदाज ६.४ टक्के होता. पण, हे आकडे आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ९.२ टक्के सुधारित वाढीच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे.

Story img Loader