नवी दिल्ली : देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) सरलेल्या जानेवारीमध्ये ५ टक्क्यांपुढे मजल मारल्याचे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. हा देशाच्या उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जातो. मुख्यतः उत्पादन क्षेत्राच्या जोमदार कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन निर्देशांक वधारला आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा (आयआयपी) संदर्भात मोजले जाणारे कारखाना उत्पादन गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी २०२४ मध्ये ४.२ टक्क्यांनी वाढले आहे. तर डिसेंबर २०२४ मध्ये त्याने ३.५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीत ५.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, जी मागील वर्षीच्या याच महिन्यात नोंदविल्या गेलेल्या ३.६ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. उत्पादन क्रियाकलापांमध्ये वाढ झाल्यामुळे जानेवारी २०२५ मध्ये देशाच्या ‘आयआयपी’मध्ये वाढ झाली आहे.
याआधी नोव्हेंबर २०२४ मध्ये ‘आयआयपी’ वाढ ५ टक्के नोंदवली गेली होती. खाण आणि वीज क्षेत्राची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. खाण उत्पादन वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. तर जानेवारी २०२५ मध्ये वीज उत्पादन वाढ गेल्या वर्षीच्या ५.६ टक्क्यांवरून २.४ टक्क्यांपर्यंत मंदावली आहे. एप्रिल-जानेवारी या कालावधीत, आयआयपी ४.२ टक्क्यांनी वाढला, जो मागील वर्षीच्या याच कालावधीतील ६ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
उपभोगाधारित वर्गीकरणानुसार, भांडवली वस्तूंच्या क्षेत्राची वाढ जानेवारी २०२४ मध्ये ७.८ टक्क्यांपर्यंत वाढली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ३.२ टक्के होती. ग्राहक टिकाऊ वस्तू क्षेत्रातील वाढ ७.२ टक्के राहिली. जी जानेवरी २०२५ मध्ये ११.६ टक्के होती. पायाभूत सुविधा/बांधकाम वस्तू क्षेत्राने जानेवारी २०२५ मध्ये ७ टक्के वाढ नोंदवली होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत ५.५ टक्के वाढ होती. प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात जानेवारी २०२५ मध्ये ५.५ टक्के वाढ झाली, जी गेल्या वर्षीच्या २.९ टक्के होती.