पीटीआय, नवी दिल्ली
खाद्यवस्तूंच्या विशेषतः भाज्यांच्या किमतीत घटल्यामुळे जानेवारीमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत महागाई दर २.३१ टक्क्यांपर्यंत नरमला आहे, असे शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले. आधीच्या म्हणजेच डिसेंबर २०२४ मध्ये हा दर २.३७ टक्के होता, तर जानेवारी २०२४ मध्ये तो ०.३३ टक्क्यांपर्यंत आक्रसला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्यामधील किंमतवाढ जानेवारीमध्ये ५.८८ टक्के नोंदवली गेली, जी डिसेंबर २०२४ मध्ये ८.४७ टक्क्यांपर्यंत वाढली होती. भाज्यांमधील किंमतवाढ डिसेंबर २०२४ मधील २८.६५ टक्क्यांवरून लक्षणीयरीत्या कमी होऊन ८.३५ टक्क्यांवर आली. खाद्यान्नांच्या किमती कमी झाल्यामुळे जानेवारीमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर देखील ४.३१ टक्के असा पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला.

प्रथिनेयुक्त आहार श्रेणीत अर्थात अंडी, मांस आणि मासे श्रेणीतील किमतीतील वाढही ३.५६ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. आधीच्या डिसेंबर महिन्यात ती ५.४३ टक्के नोंदवली गेली होती. भाज्यांमध्ये, टोमॅटोच्या किमती १८.९ टक्क्यांपर्यंत नरमल्या आहेत. मात्र बटाट्यातील महागाई ७४.२८ टक्क्यांवर आणि कांद्याच्या किमती २८.३३ टक्क्यांपर्यंत वार्षिक तुलनेत वाढल्या आहेत. इंधन आणि वीज श्रेणीमधील महागाई जानेवारीमध्ये २.७८ टक्क्यांपर्यंत कमी झाली, जी डिसेंबरमध्ये ३.७९ टक्क्यांनी घसरली होती. उत्पादित वस्तूंमध्ये मात्र महागाईमध्ये किरकोळ वाढ झाली असून डिसेंबर २०२४ मधील २.१४ टक्क्यांच्या तुलनेत ती २.५१ टक्के राहिली.

अर्थव्यवस्थेची वाट बिकट

येत्या काही महिन्यांत खाद्यान्नांच्या किमती नरमत असल्या तरी जागतिक पातळीवर वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या संरक्षणवादी व्यापार धोरणांमुळे निर्माण झालेल्या वाढत्या अनिश्चिततेने किमती वाढत आहेत. वस्तू आणि सेवांवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे. भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक व्यापार अनिश्चिततेचे बारकाईने निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक असून, ते जागतिक वस्तू बाजार आणि पुरवठा साखळ्यांवर लक्षणीय परिणाम करण्याची शक्यता आहे. याशिवाय, रुपयाच्या घसरणीमुळे आयात महाग होईल आणि त्या परिणामी महागाईचा धोका वाढेल. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत आतापर्यंत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया सुमारे ४ टक्क्यांनी घसरला आहे, असे मत केअर रेटिंग्जच्या मुख्य अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा यांनी व्यक्त केले.

आगामी काळात खाद्यान्नांच्या किमती कमी होण्याची अपेक्षा असूनही, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये घाऊक महागाई दर सरासरी २.४ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ३ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे

-राहुल अग्रवाल, वरिष्ठ अर्थतज्ज्ञ, इक्रा