नवी दिल्ली : सरलेल्या फेब्रुवारीमध्ये आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांचा उत्पादन दर २.९ टक्के असा पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर रोडावल्याचे अधिकृत आकडेवारीने शुक्रवारी स्पष्ट केले. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ७.१ टक्के, तर जानेवारीमध्ये नोंदवल्या गेलेल्या ५.१ टक्के वाढीच्या दराच्या तुलनेत लक्षणीय कमी राहिला आहे.
याआधी सप्टेंबर २०२४ मध्ये आठ प्रमुख पायाभूत क्षेत्रांचा उत्पादन दराची २.४ टक्के अशी नीचांकी पातळी नोंदवली गेली आहे. फेब्रुवारीमध्ये मुख्यतः खनिज तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनात नकारात्मक वाढ नोंदवली गेली. कोळसा उत्पादन १.७ टक्क्यांपर्यंत खालावले आहे, जे गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ११.६ टक्के होते.
तेल शुद्धीकरण उत्पादने, पोलाद आणि वीज यांच्या उत्पादनात घसरण होऊन ते अनुक्रमे १.७ टक्के, ०.८ टक्के, ५.६ टक्के आणि २.८ टक्के नोंदवले गेले. मात्र खत आणि सिमेंट उत्पादनात अनुक्रमे १०.२ टक्के आणि १०.५ टक्के वाढ झाली. आर्थिक वर्षात एप्रिल-फेब्रुवारी दरम्यान कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज या प्रमुख क्षेत्रांची वाढ ४.४ टक्के होती. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ती ७.८ टक्के होती. एकूण औद्योगिक वाढ मोजणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (आयआयपी) आठ प्रमुख क्षेत्रांचे योगदान ४०.२७ टक्के आहे.