नवी दिल्ली : मागील सहा महिन्यांतील सुमार कामगिरी नोंदविताना देशातील प्रमुख आठ क्षेत्रांची वाढ नोव्हेंबरमध्ये ७.८ टक्क्यांवर रोखली गेली, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, शुद्धीकरण उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि ऊर्जा या क्षेत्रांचा प्रमुख आठ पायाभूत क्षेत्रांत समावेश होतो.
हेही वाचा >>> सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना नववर्षाची भेट; वार्षिक व्याजदरात ०.२० टक्के वाढ
प्रमुख क्षेत्रांनी आधीच्या म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात १२.१ टक्के वाढ साधली होती. तर गेल्यावर्षी याच महिन्यात (नोव्हेंबर २०२२) मध्ये आठ प्रमुख क्षेत्रांचे उत्पादन ५.७ टक्क्यांनी वाढले होते. मात्र एप्रिल ते नोव्हेंबर या २०२२-२३ मधील पहिल्या आठ महिन्यांतील त्यांचे उत्पादन ८.१ टक्क्यांच्या तुलनेत ८.६ टक्के नोंदवले गेले आहे. नोव्हेंबर महिन्यात मुख्यत्वे सिमेंट क्षेत्रामुळे प्रमुख क्षेत्रांच्या वाढीला बाधा पोहचवली आहे. ऑक्टोबरमध्ये १७.४ टक्के राहिलेले सीमेंट उत्पादन नोव्हेंबरमध्ये ३.६ टक्क्यांपर्यंत खाली आले. कोळशाचे उत्पादन ऑक्टोबरमधील १८.४ टक्क्यांच्या तुलनेत केवळ १०.९ टक्क्यांनी वाढले. तर खनिज तेलाचे उत्पादन ऑक्टोबरमध्ये १.३ टक्के होते ते आता ०.४ टक्क्यांनी घसरले. नैसर्गिक वायूचे उत्पादन ७.६ टक्क्यांनी वाढले. खते, वीज आणि पोलाद उद्योगातील वाढ ऑक्टोबरच्या तुलनेत कमी होती. ते अनुक्रमे ३.४ टक्के, ९.१ टक्के आणि ५.६ टक्क्यांनी विस्तारले. केवळ शुद्धीकरण उत्पादने ऑक्टोबरमधील ४.२ टक्क्यांच्या तुलनेत १२.४ टक्क्यांनी वाढले.