मुंबईः कौतुकाच्या भावनेने बक्षीस देण्याचा अनोखा मार्ग स्वीकारत, प्रुडंट कॉर्पोरेट ॲडव्हायझरी सर्व्हिसेस लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय शहा यांनी त्यांच्या वैयक्तिक मालकीचे सुमारे ३४ कोटी रुपये मूल्याचे १७५,००० समभाग हे भेट स्वरूपात कर्मचाऱ्यांमध्ये वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाभार्थ्यांमध्ये कंपनीचे आणि तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांतील ६५० कर्मचारी तसेच शहा यांचे वैयक्तिक कर्मचारी, घरगुती मदतनीस आणि वाहन चालक यांचा समावेश आहे. हे हस्तांतरण शहा यांनी त्यांच्या व्यवसायात २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञतेचे प्रतीक या स्वरूपात होत असून, ते कोणत्याही बंधनाविना किंवा धारणेबाबत अटी-शर्ती न जोडता केले जाणार आहे.
देशातील पाचवी मोठी म्युच्युअल फंड वितरक कंपनी असलेल्या प्रुडंटमध्ये संजय शहा यांची वैयक्तिक सुमारे ४२ टक्के, तर त्यांच्या कुटुंबीयांकडे अतिरिक्त १३ टक्के हिस्सेदारी आहे, ज्यामुळे एकूण प्रवर्तकांचा हिस्सा ५६ टक्के आहे. ‘मला माझ्या कर्मचाऱ्यांना तेही कंपनीचे मौल्यवान सदस्य आहेत असे वाटावे म्हणून हा नजराणा देऊन त्यांना आश्चर्यचकित करायचे होते,’ असे शहा म्हणाले.
२०२२ मध्ये सूचीबद्ध झालेला प्रुडंटच्या समभागाचा भाव गुरुवारी मुंबई शेअर बाजारात १,९९० रुपयांवर बंद झाला. २०२२ मधील प्रति समभाग ६३० रुपयांच्या ‘आयपीओ’ किमतीच्या तुलनेत तो लक्षणीयरीत्या वधारला आहे. या व्यवहारासाठी सल्लागार म्हणून कॅटलिस्ट ॲडव्हायझर्सने काम केले आणि ‘सेबी’कडून मंजुरीचे सर्व सोपस्कारही तिनेच पूर्ण केले. सेबीच्या मंजुरीनुसार, कंपनीकडून या हस्तांतरणाच्या अंमलबजावणीपूर्वी लाभार्थ्यांच्या यादीचा उलगडा करण्यासह शेअर बाजारांकडे योग्य ती प्रगटने केली जातील.