पुणे : देशातील हवाई क्षेत्राचा विस्तार अतिशय वेगाने होत आहे. गेल्या दहा वर्षांतील देशातील विमानांची संख्या ४०० वरून ७०० वर गेली आहे. पुढील पाच वर्षांत देशातील विमानांच्या संख्येत आणखी हजाराने वाढ होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी दिली.
हेही वाचा >>> ‘बीसीसीआय’च्या दिवाळखोरी दाव्याला आव्हान देण्याची ‘बैजूज’ची तयारी
पॅनासोनिक ॲव्हिओनिक्सच्या सॉफ्टवेअर डिझाइन व विकास केंद्राचे उद्घाटन बुधवारी हिंजवडीत झाले. यावेळी मोहोळ बोलत होते. या कार्यक्रमाला पॅनासोनिक ॲव्हिओनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी केन सैन उपस्थित होते. मोहोळ म्हणाले की, देशातील हवाई क्षेत्राचा गतिमान विस्तार सुरू आहे. या क्षेत्राची वाढ करतानाच आपल्याला त्यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करावी लागेल. प्रवाशांची सुरक्षितता आणि आरामदायी प्रवास या बाबीही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांचे मनोरंजन हा घटकही महत्त्वाचा आहे.
हेही वाचा >>> बँक ठेवींवर आता ७.३५ टक्क्यांपर्यंत लाभ ! विविध बँकांकडून अतिरिक्त व्याजदराच्या विशेष योजना
पॅनासोनिक ॲव्हिओनिक्स या दृष्टीने प्रयत्न करीत असून, पुण्यात नवीन केंद्र त्यांनी सुरू केले आहे. या केंद्राच्या माध्यमातून पुण्यातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होतील. पॅनासोनिक ॲव्हिओनिक्सच्या केंद्रात सध्या २०० अभियंते कार्यरत आहेत. आगामी काळात ही संख्या दुपटीने वाढविली जाणार आहे. विमान कंपन्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सेवा प्रदान करण्यावर या केंद्राच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे.