लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी
मुंबईः तब्बल साडेसात हजारांहून अधिक किलोमीटर लांबीची विस्तृत किनारपट्टी लाभलेल्या भारताचे सागरी व्यापार आणि नौकानयन क्षेत्र लक्षणीय प्रगती करीत असून, पाच लाख कोटी डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यात या क्षेत्राचे मोठे योगदान असेल, मात्र त्यासाठी देशात आजच्या तुलनेत अधिक प्रशिक्षित खलाशांची गरज असल्याचे प्रतिपादन शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सब्यसाची हाजरा यांनी बुधवारी येथे केले. सागरी पायाभूत सुविधांना वाहिलेल्या ‘इनमेक्स एसएमएम इंडिया’ या प्रदर्शन व परिषदेच्या १३ व्या आवृत्तीचे बुधवारी गोरेगाव येथील मुंबई प्रदर्शन संकुलात उद्घाटन झाले.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाशी संलग्न नौकानयन महासंचालनालयाचे महासंचालक श्याम जगन्नाथन यांच्यासह नामवंत दिग्गजांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ‘इनमेक्स एसएमएम इंडिया’च्या आयोजन मंडळाचे अध्यक्ष या नात्याने हाजरा म्हणाले, जगभरात प्रशिक्षित खलाशांचा सर्वाधिक पुरवठा करणारा फिलिपाइन्सनंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून भारताचे स्थान आहे. मात्र सध्या जागतिक सागरी क्षेत्रातील मनुष्यबळातील ९ टक्के असलेले योगदान हे २० टक्क्यांवर नेता येईल, इतक्या पायाभूत व प्रशिक्षण सुविधा देशात निश्चितच आहेत, अशी पुस्तीही हाजरा यांनी जोडली.
हेही वाचा… व्याजदर बदलण्याची शक्यता शून्यच! रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू; शुक्रवारी निर्णय
इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडियाद्वारे हॅम्बर्ग मेस्सेच्या सहयोगाने आयोजित या तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात भारतासह, दक्षिण आशियातून २५० हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले असून, त्यात ८० विदेशी प्रदर्शकांचा समावेश आहे. सागरी सुविधा विकास, तंत्रज्ञान व माहितीची देवाणघेवाण आणि नावीन्यता यावर चर्चासत्रेही त्यात रंगणार आहेत. प्रदर्शन व चर्चासत्रात ६,००० हून अधिक नावनोंदणी केलेल्या व्यापार प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षित आहे.