इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रथमच नफा नोंदवला आहे. भारतीय पोस्टच्या उपकंपनीने गेल्या आर्थिक वर्षात २०.१६ कोटी रुपयांचा कार्यान्वयन नफा (operating profit) कमावला आहे. या कालावधीत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या उत्पन्नात ६६.१२ टक्के वाढ झाली आहे. या दरम्यान खर्चात १७.३६ टक्के वाढ झाली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, २०२२-२३ मध्ये IPPB ने २०.१६ कोटी रुपयांचा कार्यान्वयन नफा (operating profit) नोंदवला आहे. या काळात बँकेच्या व्यवसायात बरीच वाढ झाली आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक २० कोटींवर कशी पोहोचली?
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे वेंकटरामू म्हणाले की, जन धन योजना, आधार आणि इंडिया स्टॅक यांसारख्या उपक्रमांसह आर्थिक समावेशावर सरकारचा भर आणि नियामक समर्थन यांनी बँकेच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच बँकेने वित्त व्यवस्थापन पूर्ण कार्यक्षमतेने केले असल्याचे सांगितले. याशिवाय बँकेने आर्थिक ऑफर वाढवली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे उद्दिष्ट स्वतःला एका युनिव्हर्सल बँकेत बदलण्याचे आहे. डिजिटल पायाभूत सुविधांचा वापर करून ही सेवा शेवटच्या टोकापर्यंत उपलब्ध करून द्यावी लागेल.
हेही वाचाः मोदी सरकार पुढील महिन्यात महागाई भत्ता वाढवण्याच्या तयारीत, पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजे काय?
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) पोस्ट विभागाच्या अंतर्गत येते. त्याची १०० टक्के भागीदारी भारत सरकारकडे आहे. याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ सप्टेंबर २०१८ रोजी केली होती. बचत खाते, चालू खाते, मनी ट्रान्सफर, मनरेगा आणि पोस्टल उत्पादने इ. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक पुरवतात.