मुंबई : आघाडीचे जागतिक संपत्ती केंद्र म्हणून उदयास येत असलेल्या भारतात सध्या ८५,६९८ अतिश्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. जागतिक स्तरावर अमेरिका, चीन आणि जपाननंतर सर्वाधिक श्रीमंतांची संख्या भारतात अधिक आहे, असे नाईट फ्रँकच्या ताज्या अहवालाचे निरीक्षण आहे.
नवीनतम संपत्ती अहवालानुसार, वर्ष २०२४ मध्ये ज्यांची गुंतवणूक करण्यायोग्य मालमत्ता किमान ८ कोटी अमेरिकी डॉलर अशांना अतिश्रीमंत मानले गेले आहे. जागतिक स्तरावर अशा अतिश्रीमंतांच्या संख्येत ४.४ टक्के वाढ झाली असून त्यांची संख्या २३ लाखांवर पोहोचली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, ८.७ अब्ज डॉलरपेक्षा अधिक मालमत्ता असलेल्या अतिश्रीमंत असलेल्या व्यक्तींची संख्या पहिल्यांदाच वार्षिक एक लाखांपेक्षा अधिक भर पडली आहे, जी जगभरातील संपत्तीच्या वाढत्या कलाचे प्रतिबिंब आहे.
एचएसबीसीचे जागतिक अर्थतज्ज्ञ जेम्स पोमेरॉय यांनी या संपत्ती वाढीचे श्रेय कमी व्याजदर आणि भांडवली बाजारातून मिळणाऱ्या आकर्षक परतावा यांच्या संयोजनाला दिले. जगातील प्राथमिक संपत्ती निर्माता म्हणून अमेरिकेचे वर्चस्व कायम आहे. जगभरातील जवळजवळ ४० टक्के अत्युच्च श्रीमंत (एचएनडब्ल्यूआय) अमेरिकेत राहतात, ही संख्या चीन आणि जपानपेक्षा खूपच अधिक आहे, ज्यांचा वाटा प्रत्येकी केवळ ५ टक्के आहे. या देशांच्या वर्चस्वानंतरही, भारताने ८५,६९८ अतिश्रीमंतांसह प्रभावी वाढ दाखविली आहे. देशाच्या आर्थिक गतिमानतेमुळे उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये, एचएनडब्ल्यूआय म्हणजे अतिश्रीमंतांची संख्या वेगाने वाढत आहे.