नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवरून वाढवून तो ७.१ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च या पतमानांकन संस्थेने हा सुधारित अंदाज सोमवारी वर्तविला. इंडिया रेटिंग्ज वर्तविलेला सुधारित अंदाज हा चालू आर्थिक वर्षातील विकास दराच्या रिझर्व्ह बँकेच्या नवीन अनुमानापेक्षा थोडा जास्त आहे.
रिझर्व्ह बँकेच्या अनुमानापेक्षा पहिल्या आणि चौथ्या तिमाहीत विकास दर जास्त राहील आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत कमी राहील, असे तिने म्हटले आहे. विकास दराच्या अंदाजातील वाढही प्रामुख्याने सरकारकडून वाढलेला भांडवली खर्च, कंपन्या आणि बँकिंग क्षेत्राच्या ताळेबंदातील कमी झालेला बुडीत कर्जाचा बोजा आणि खासगी कंपन्यांच्या भांडवली खर्चाचे सुरू झालेले चक्र यावर आधारित आहे. अनेक सकारात्मक निदर्शक असले तरी विकास दराच्या वाढीत काही आव्हानेही आहेत. त्यात ग्राहक उपभोग अर्थात मागणीतील असमान वाढ आणि जागतिक पातळीवरील परिस्थितीमुळे निर्यातीसमोरील अडचणी यांचा समावेश आहे. याबाबत सावधगिरीचा इशाराही इंडिया रेटिंग्जने दिला आहे.