नवी दिल्ली : केंद्र सरकारची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑगस्ट अशा पहिल्या पाच महिन्यांत वार्षिक उद्दिष्टाच्या २७ टक्क्यांवर पोहोचल्याचे सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरकारचा खर्च आणि महसुली उत्पन्न यातील तफावतीला वित्तीय तूट म्हटले जाते. देशाचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) कार्यालयाने वित्तीय तुटीची ही आकडेवारी सोमवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, तूट चालू आर्थिक वर्षात ऑगस्टअखेरीस ४ लाख ३५ हजार १७६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत वित्तीय तूट वार्षिक उद्दिष्टाच्या ३६ टक्के होती.

हेही वाचा >>> ‘पीपीएफ’ गुंतवणूकदारांना मिळणार ७.१ टक्क्यांचा लाभ; पोस्टाच्या योजनांवरील व्याजदर सलग तिसऱ्या तिमाहीत जैसे थे!

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ४.९ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ५.६ टक्के वित्तीय तूट होती. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट १६ लाख १३ हजार ३१२ कोटी रुपयांच्या मर्यादेत ठेवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

सरकारला चालू आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांत ८.७ लाख कोटी रुपयांचा कर महसूल मिळाला आहे. अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या तो ३३.८ टक्के आहे. गेल्या वर्षी जुलैअखेरीस सरकारचा कर महसूल ३४.५ टक्के होता. सरकारचा ऑगस्टअखेरीस एकूण खर्च १६.५ लाख कोटी रुपये असून, तो अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या ३४.३ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या ३७.१ टक्के होता, असे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने म्हटले आहे. पाच महिन्यांत सरकारकडून झालेल्या एकूण खर्चापैकी १३.५१ लाख कोटी रुपये हा महसुली खर्च असून, उर्वरित सुमारे ३ लाख कोटी रुपये हा भांडवली खर्च आहे. महसुली खर्चामध्ये सर्वाधिक सुमारे ४ लाख कोटी रुपये हे सरकारने घेतलेल्या कर्जाचे व्याज फेडण्यावर खर्च झाले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India s april august fiscal deficit at 27 percent of full year target print eco news zws