मुंबई: देशाची चालू खात्यावरील तूट एप्रिल ते जून या तिमाही ९.७ अब्ज डॉलरवर पोहोचली असून, तील सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत १.१ टक्क्यांवर गेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती ८.९ अब्ज डॉलर म्हणजेच जीडीपीच्या तुलनेत १ टक्का पातळीवर होती, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने सोमवारी दिली. उल्लेखनीय म्हणजे जानेवारी ते मार्च २०२४ या आधीच्या तिमाहीत चालू खात्यावर ४.६ अब्ज डॉलरचे (जीडीपीच्या तुलनेत ०.५ टक्क्यांचे) आधिक्य होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ॲमेझॉनकडून विक्रेत्यांच्या शुल्कात कपात; दिवाळीच्या तोंडावर पाऊल; राज्यातील १ लाख ८० हजारांना फायदा

रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, देशाच्या वस्तू व्यापारातील तफावत चालू खात्यावरील तूट वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत वस्तू व्यापारातील तफावत ६५.१ अब्ज डॉलर असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ती ५६.७ अब्ज डॉलर होती. पहिल्या तिमाहीत सेवा क्षेत्राच्या निव्वळ निर्यात उत्पन्नात वाढ होऊन ते ३९.७ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत ते ३५.१ अब्ज डॉलर होते. संगणकीय सेवा, व्यवसाय सेवा, पर्यटन सेवा आणि वाहतूक सेवा क्षेत्रात वाढ झालेली आहे. पहिल्या तिमाहीत निव्वळ परकीय संस्थात्मक गुंतवणुकीत मोठी घसरण होऊन, ती ०.९ अब्ज डॉलरवर मर्यादित राहिली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती १५.७ अब्ज डॉलर होती. बाह्य वाणिज्य कर्जाअंतर्गत निव्वळ ओघ पहिल्या तिमाहीत कमी होऊन १.८ अब्ज डॉलरवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ५.६ अब्ज डॉलर होता. परदेशस्थ भारतीयांनी पहिल्या तिमाहीत २९.५ अब्ज डॉलर मायदेशी पाठविले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत ही रक्कम २७.१ अब्ज डॉलर होती. त्यात आता वाढ नोंदविण्यात आली आहे. निव्वळ थेट परकीय गुंतवणूक ६.३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती ४.७ अब्ज डॉलर होती, असे रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India s current account deficit widens to 1 1 percent of gdp print eco news zws